Kajol New Movie:काजोल (Kajol) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९२ साली 'बेखुदी' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या काजोलने इंडस्ट्रीत स्वत: चं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या फिल्मी कारकिर्दीत तिने एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. अलिकडेच अभिनेत्री 'दो पत्ती' सिनेमामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता लवकरच काजोल एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मॉं' असं या चित्रपटाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. नुकतंट 'मॉं' चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे.
आता काजोल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या चित्रपटात बालकलाकार खिरीन शर्मा देखील तिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विशाल पुरिया यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट २७ जून २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्रीचा धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. "दस्तक शैतान ने दी और अब जवाब माँ देगी...", अशी चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.
दरम्यान, काजोलच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी काजोल 'दो पत्ती' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने महिला पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. काजोलने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केल आहे. मात्र, या चित्रपटात ती एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे.