Diana Penty: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या स्वतःला मुख्य भूमिकेत सिद्ध करण्यासाठी सतत धडपड करत राहिल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे डायना पेन्टी.' कॉकटेल',' हॅप्पी भाग जायेंगी','छावा' यांसारख्या चित्रपटामुळे प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री सध्या तिची आगामी वेबसीरीज 'Do You Wanna Partner' मुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये डायना पेन्टी आणि तमन्ना भाटिया पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. याचनिमित्ताने एका प्रमोशन इव्हेंटमध्ये डायनाने इंडस्ट्रीत काम करताना तिला आलेले अनुभव शेअर केले आहेत. शिवाय इंडस्ट्रीतील काही लोकांनी आपल्याला चुकीचे सल्ले देखील दिल्याचं तिने सांगितलं.
अलिकडेच डायना पेन्टीने 'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'सोबत संवाद साधला. त्यादरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की, "जेव्हा मी करिअरची सुरुवात केली तेव्हा अगदीच मितभाषी होते. त्यावेळी काही जणांनी मला असाही सल्ला दिला होता की स्वत: मध्ये बदल कर. मला कुठेतरी असं बनावं लागेल जी मुळात नाहीच आहे, तरच लोक मला इथे स्वीकारतील.पण माझ्यासाठी या गोष्टी खूप कंटाळवाण्या होत्या. मुळात माझा स्वभाव तसा नसल्यामुळे असं वागणं मला जमणारच नव्हतं."
पुढे अभिनेत्रीने सांगितलं, "मी अशी बरीच वर्षे त्यांच्या सल्ल्यानूसार वागत होते. पण, कालांतराने मला याची जाणीव झाली. मी हे सगळं का करते आहे? असं वाटू लागलं. जर कोणाला वाटत असेल की मी त्यांच्या मनासारखी वागत नाही, किंवा त्या एका कारणामुळे ते जर मला चित्रपट नाकारत असतील तर त्याने मला काहीच फरक पडणार नाही. माझ्यासाठी फक्त माझं काम महत्त्वाचं आहे." अशा भावना अभिनेत्रीने या मुलाखतीत व्यक्त केल्या.
डायना पेन्टीने कॉकटेल सिनेमातून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानची देखील प्रमुख भूमिका होती. अलिकडेच ती छावा चित्रपटात पाहायला मिळाली. 'छावा' मध्ये तिने औरंजेबाच्या मुलीची झिनतची भूमिका साकारली होती. तिच्या कामाचं सगळ्यांनीच कौतुक केलं.