Veer Pahariya: बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया (Veer Pahariya)अलिकडेच त्याच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्याने या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. १५ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. संदीप केवळानी आणि अभिषेक कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात वीर पहारियासह अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सारा अली खान आणि निम्रत कौर महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्याच्या पहिल्याच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु अभिनेत्याची त्याच्या या चित्रपटापेक्षा त्यातील एका डान्स स्टेपमुळे सर्वाधिक चर्चा झाली. त्यामुळे वीर पहाडियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर आता अभिनेत्याने भाष्य केलं आहे.
नुकतीच वीर पहाडियाने 'Hauterrfly' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले. त्यादरम्यान अभिनेत्याने स्काय फोर्समधील रंग गाण्यातील डान्स स्टेपवरून झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. त्याचवेळी मुलाखतीमध्ये वीर म्हणाला, "माझं हे गाणं रिलीज झाल्यानंतर ते खूप व्हायरल झालं. त्यामुळे मला ट्रोलही करण्यात आलं. परंतु यामुळे मी आणखी व्यस्त झालो आहे. माझ्यासाठी कामाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. इतकंच नाही तर मी काही ठिकाणी लग्नामध्ये जाऊन त्याच गाण्यातील डान्स स्टेप सुद्धा केली आहे. ट्रोलिंगमुळे एक प्रकारे माझं नुकसान नाही तर फायदाच झाला."
पुढे अभिनेता म्हणाला, "जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. शिवाय जे लोक मला त्या डान्स स्टेपवरुन ट्रोल करत आहेत त्यांना मी आणखी ट्रोल करायला सांगेन. कारण त्यामुळे मला लोकप्रियता मिळते आहे."
दरम्यान, वीर पहाडियाचा स्काय फोर्स' हा देशभक्तीपर सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'स्काय फोर्स' सिनेमा १९६५ च्या भारत-पाकिस्तान हवाई युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर आधारित आहे.