Sunny Sanskari Ki Tulsi Kumar : यंदाच्या वर्षात मोठ्या पडद्यावर एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित केले जात आहे. हटके कथानकावर आधारित नवनवीन बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.या चित्रपटांना सिनेरसिकांची देखील तितकीच पसंती मिळताना दिसते आहे. अशातच धर्मा प्रोडक्शनकडून वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टार ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. अलिकडेच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. त्यानंतर आता वरुण-जान्हवीच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अपडेट समोर आली आहे.
'बवाल' चित्रपटानंतर वरुण धवन आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचा निर्माता करण जोहरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या टीझरशी संबंधित तसेच रिलीज डेटबद्दल माहिती शेअर केली आहे."मंडप सजेगा महफिल जमेंगी, पर सनी और तुलसी की स्क्रिप्ट सारी बदल देंगी...", असं कॅप्शन देत सोशल मीडियावर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.
यासोबतच धर्मा प्रोडक्शमार्फत चित्रपटाच्या टीझरबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा टीझर या शुक्रवारी म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. तर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, अशी अपडेटही या पोस्टद्वारे देण्यात आली आहे.दरम्यान, या चित्रपटामध्ये वरुण धवन आणि जान्हवी कपूरसह रोहित सराफ,सान्या मल्होत्रा, मनीष पॉल आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं आहे.त्यांनी यापूर्वी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.