Chaalbaaz Movie: अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi), रजनीकांत (Rajnikanth) आणि सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत असलेला 'चालबाज' हा सिनेमा प्रचंड गाजला. या चित्रपटाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. 'चालबाज’ हा सिनेमा हेमा मालिनी यांच्या 'सीता और गीता' सिनेमाचा रिमेक असल्याचं सांगण्यात येतं. परंतु या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि श्रीदेवी यांचा नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'चालबाज 'या सिनेमातील 'ना जाने कहां से आई है ये लड़की' हे गाणं देखील त्यावेळी चांगलच गाजलं होतं. मात्र, हे गाणं शूट करण्यापूर्वी अभिनेता सनी देओल चक्क २ तास सेटवरून गायब झाला होता. याचा खुलासा खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज प्राशर यांनी एका मुलाखतीत केला आहे.
नुकतीच पंकज प्राशर यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत 'चालबाज' चित्रपटातील 'ना जाने कहां से आई है ये लड़की' या गाण्याचा मजेशीर किस्सा शेअर केला आहे. त्यादरम्यान मुलाखतीत पंकज प्राशर म्हणाले, 'ना जाने कहां से आई है' गाणं शूट करण्यासाठी आमच्या हातात फक्त ३ दिवस शिल्लक होते. शिवाय श्रीदेवी यांनी गाण्यासाठी उत्तम विज्यूअल्स पाहिजे असं सांगितलं होतं. आता सरोज खान यांच्यासमोर सनी देओलला नाचवणं हे मोठं आव्हान होतं. त्याचदरम्यान, श्रीदेवी मला म्हणाल्या की, सरोज खान यांनी मला फोनद्वारे त्या खुश असल्याचं कळवंल आहे. परंतु या गाण्यासाठी काही युनिक स्टेप्स कोरिओग्राफ कराव्या लागतील, असं त्यांचं म्हणणं होतं."
पुढे ते म्हणाले, "अखेर आम्ही गाण्याच्या शूटला सुरूवात केली. त्यावेळी प्रत्येकाला नवनवीन कल्पना सूचत होत्या. शेवटी सनी देओल आणि श्रीदेवी यांचा डान्सचा सीन शूट करण्याची वेळ आली. त्यानंतर सनी देओलने मी वॉशरुमला जातो असं सांगितलं आणि तो परत आलाच नाही. जवळपास दोन तास शोधल्यानंतरही तो सापडला नाही. त्यामुळे अभिनेता डान्स स्टेप्स करताना घाबरत असल्याचा अंदाज अनेकांनी बांधला. यादरम्यान श्रीदेवी वारंवार हिरोबद्दल विचारू लागल्या. त्याच्यानंतर अचानक सनी देओल सेटवर आला. मला आजतागायत तो त्या दिवशी नेमका कुठे गायब झाला होता? याची माहिती नाही. सेटवरील प्रत्येकजण त्याची वाट पाहत होता. पण, त्याने हे गाणं उत्तमरित्या शूट केलं, या गाण्याचं शूट झाल्यानंतर श्रीदेवीने मला तुम्ही एक क्लासिक शूट केलं आहे. असं म्हटलं होतं. त्यांचे ते कौतुकोद्गार आजच्या माझ्या लक्षात आहेत." असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला.