Sonu Sood :बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा (Sonu Sood) बहुचर्चित 'फतेह' हा चित्रपट काल १० जानेवारील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सोनू सूद या चित्रपटामध्ये अॅक्शन हिरोच्या रुपात पाहायला मिळतोय. 'फतेह'च्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवलं आहे. दरम्यान, हिरोच्या भूमिकेपेक्षा सोनू सूदने साकारलेली खलनायिकी पात्रे प्रेक्षकांनी प्रचंड आवडली. २०१० मध्ये आलेल्या 'दबंग' चित्रपटात त्याने साकारलेली छेदी सिंहची भूमिका प्रेक्षकांना भावली. 'दबंग'मध्ये अभिनेत्याचा खलनायिकी अंदाजाने चाहत्यांची मनं जिंकली होती. सलमान खान स्टारर 'दबंग' चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. त्याचबरोबर चित्रपटातील गाणी देखील चांगलीच गाजली. दरम्यान, अलिकडेच सोनू सूदने 'दबंग'मधील 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्याचा किस्सा शेअर केला आहे.
नुकतीच सोनू सूदने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी अभिनेत्याने 'मुन्नी बदनाम हुई' गाण्यामध्ये सलमान खानच्या एन्ट्रीचा किस्सा सांगितला. त्यावेळी सोनू सूद म्हणाला, "मी दिग्दर्शक अभिनव कश्यप यांना सांगितलं होतं की चित्रपटात माझ्यासाठी एक गाणं पाहिजे. त्यावर त्यांनी होकार दिला. मग 'मुन्नी बदनाम हुई' गाणं तयार करण्यात आलं. फराह खान हे गाणं कोरिओग्राफ करत होत्या. त्यादरम्यान मी फराह खान यांना म्हटलं, गाण्यासाठी अशा स्टेप्स कोरिओग्राफ करा की ज्यामुळे गाणं हिट होईल. त्यानंतर गाणं शूट होण्याच्या २ ते ४ दिवस आधी मला अभिनव यांनी सांगितलं की यार, एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी देखील आहे. मग मी म्हणालो, "मला चांगली बातमी सांगा, त्याचवेळी त्यांनी सांगितलं की 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यामध्ये सलमान खानची सुद्धा असणार आहे."
पुढे अभिनेत्याने सांगितलं,"मुन्नी बदनाम हुई' गाण्यामध्ये सलमानची एन्ट्री होणार हे ऐकताच मी सुरुवातीला नाराज झालो होतो. पण, नंतर सगळं काही चांगलं झालं." मग मी अभिनव कश्यप यांना म्हणालो, "भाई, गाणं माझं आहे आणि सलमानमध्येच एन्ट्री कसा करेल? मग ते म्हणाले, या गाण्यामध्ये तो रेड मारणार असल्याचा सीन आहे. माझं चित्रपटात एकच गाणं आहे आणि त्यातही रेड मारण्याचा सीन तुम्ही घेताय तुम्ही असं का करताय मलाच समजत नाही, असं मी त्यांना त्यावेळी म्हणालो. परंतु जे काही झालं ते चांगलंच झालं." असा खुलासा सोनू सूदने केला.