King Movie: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. आजपर्यंत त्याने इंडस्ट्रीला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. दिल है हिंदुस्तानी, परदेस, बादशाह, कुछ कुछ होता है, पठाण तसेच जवान अशा रोमॅन्टिक, अॅक्शन आणि कॉमेडी सिनेमांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी किंग चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खान देखील पाहायला मिळणार आहे. अनिल कपूर शिवाय या सिनेमात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत आहे. तसेच अभिषेक बच्चन, सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभय वर्माही यांचीही भूमिका आहे. अशातच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. किंग चित्रपटात आता आणखी एका एन्ट्री झाली आहे. हा अभिनेता कोण आहे, जाणून घ्या.
शाहरुख कायम विविध धाटणीच्या भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्यात आता सगळीकडे त्याच्या किंग या चित्रपटाबद्दल चर्चा रंगली आहे. अनिल कपूर यांच्यानंतर या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ यांचं नाव जोडलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
१९९५ साली आलेला 'त्रिमूर्ती' आठवतोय? या सिनेमात शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर तिघेही मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर अनिल कपूर आणि शाहरुख एकत्र दिसले नाहीत. मात्र आता 'किंग' मध्ये शाहरुखसह अनिल कपूर, जॅकी श्रॉफ हे त्रिकूट प्रेक्षकांना बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.