Gulshan Grover: बॉलिवूडचे 'बॅड मॅन' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते गुलशन ग्रोवर यांना ओळखलं जातं. ८० च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. उत्तम अभिनय आणि संवाद कौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गुलशन ग्रोवर यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, त्यांच्या वाट्याला खलनायकाच्या भूमिका आल्याचं पाहायला मिळालं. या भूमिकांना त्यांनी न्याय पुरेपूर दिला. त्यामुळे त्यांना बॅड मॅन हा टॅग मिळाला. दरम्यान, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत गुलशन ग्रोवर यांनी निगेटिव्ह भुमिका साकारल्यामुळे त्यांना आलेले विचित्र अनुभव शेअर केले आहेत.
'मोहरा','राम लखन', 'राजा बाबू' तसंच 'टार्झन' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम करुन गुलशन ग्रोवर यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. आजही ते इंडस्ट्रीत तितकेच सक्रिय आहेत. अशातच अलिकडेच त्यांनी अर्चना पूरण सिंह आणि परमीत सेठी यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी व्लॉदरम्यान गुलशन यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. चित्रपटातील निगेटिव्ह भूमिका पाहून मुली घाबरुन दूर पळायच्या. असं त्यांनी सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, "त्याकाळी सोशल मीडिया वगैरे असं काही नव्हतं. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्या जवळ येत नसे. त्या मला पाहून दूर पळायच्या कारण त्यांना वाटायचं की स्क्रीनवर मी जसा दिसतो, खऱ्या आयुष्यातही मी तसाच आहे."
यापुढे गुलशन ग्रोवर म्हणाले, "त्यानंतर जेव्हा सोशल मीडिया आला आणि मी पार्टीला गेलो तेव्हा मी अर्चनाला मिठी मारली. तेव्हा एक दुसरी एक अभिनेत्री आमच्याकडे एकटक पाहत होती. तिला असं वाटलं की, चित्रपटात तर काही वेगळंच दाखवण्यात आलं होतं. आता हे दोघे एकमेकांना मिठी मारत आहेत. पण, सोशल मीडिया आल्यानंतर लोकांना सत्य काय आहे, हे समजलं." असा खुलासा त्यांनी केला.
सध्या गुलशन ग्रोवर सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'हीर एक्सप्रेस' मुळे चर्चेत आहेत. येत्या १२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.