Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाईकवर भारताचा तिरंगा पाहताच वाटेतच थांबले अनुपम खेर; जाणून घ्या त्या सिग्नलवर नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 17:56 IST

Anupam kher: हा व्हिडीओ शूट करण्यासाठी अनुपम खेर यांनी त्यांच्या गाडीच्या काचा खाली केल्या आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली.

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराचं दर्शन घडवणारा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारली असून सर्व स्तरांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इतकंच नाही तर ते सोशल मीडियावरही सातत्याने चर्चिले जात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचा सोशल मीडियावरील वावर कमालीचा वाढला असून ते सातत्याने समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे व्यक्त होताना दिसत आहेत. यामध्येच त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अलिकडेच अनुपम खेर यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार त्यांच्या गाडीपुढे असल्याचं दिसून येत आहे. 'या मुलाला पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल', असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत असं का म्हटलं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. परंतु, या पोस्टमध्येच त्यांनी या प्रश्नाचं उत्तरं दिलं आहे.

"आज सकाळीच दिल्लीत मी शूटिंगला जाताना #AnilKumarMorya च्या बाईकवर भारताचा तिरंगा पाहिला आणि माझी छाती अभिमानानं फुलून आली. भारतात असे ९९.०९ टक्के लोक राहतात. बाकी .०१ टक्के दु:खी आत्मा आहेत. #AnilKumarMorya की जय हो! #TrueIndian #IndianFlag #CommonMan", असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला. विशेष म्हणजे या बाईकस्वाराच्या गाडीवर भारताचा तिरंगा असल्यामुळे त्यांना विशेष अभिमान आणि कौतुक वाटल्यामुळे त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला.

हा व्हिडीओ शूट करण्यासाठी अनुपम खेर यांनी त्यांच्या गाडीच्या काचा खाली केल्या आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. परंतु, अनुपम खेर यांना शेजारी पाहिल्यावर या बाईक स्वाराला धक्का बसला. मात्र, यावेळी अनुपम खेर यांनी सामान्य नागरिकाप्रमाणे त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अगदी कधीपासून हा झेंडा बाईकवर लावला आहे, इथपासून ते आता कुठे चाललास इथपर्यंत त्यांनी या मुलाची चौकशी केली.

दरम्यान, अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेल्या द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली आहे. या चित्रपटात त्यांच्या व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर ही दिग्गज कलाकार मंडळीदेखील झळकली आहेत.

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाद काश्मीर फाइल्स