Join us

अनुपम खेर यांच्या कपड्यांमध्ये शिरल्या होत्या लाल मुंग्या; पहिल्याच सिनेमात त्यांच्यासोबत घडला होता किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 14:22 IST

Anupam kher: सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमाचा अनुभव शेअर केला आहे.

उत्तम अभिनय आणि भूमिकेला न्याय द्यायचं कौशल्य यांच्या जोरावर लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अनुपम खेर (anupam kher). आजवरच्या कारकिर्दीत अनुपम खेर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. कधी खलनायिकी तर कधी विनोदी भूमिका साकारुन त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पहिल्या सिनेमाचा एक किस्सा चर्चिला जात आहे. पहिल्याच सिनेमात त्यांच्या कपड्यांमध्ये चक्क लाल मुंग्या शिरल्या होत्या. मात्र, तरी सुद्धा त्यांनी त्या सीनचं चित्रीकरण पूर्ण केलं.

सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमाचा अनुभव शेअर केला आहे. यात पहिल्याच सिनेमात त्यांच्या कपड्यांमध्ये मुंग्या शिरल्या होत्या. ज्यामुळे त्यांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं होतं.

नेमका काय घडला होता किस्सा?

"खरं तर मी FTII मध्ये अनेकदा कॅमेरा फेस केला होता. पण, ज्यावेळी मी मुंबईत काम शोधायला आलो त्यावेळी उत्सव या सिनेमातून पहिल्यांदा खऱ्या अर्थाने कॅमेरासमोर झळकलो. या सिनेमात मी शशी कपूर यांच्या मागे अंगरक्षकासारखं धावत होतो. या सिनेमाचं भरतपूरमध्ये चित्रीकरण सुरु होतं. त्यावेळी आम्ही दिवसभर मेकअप करुन बसायचो आणि ज्यावेळी आमचा शॉट येईल त्याचवेळी धोतर नेसून शुटिंगसाठी जायचो", असं अनुपम खेर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "एकदा असंच दुपारच्या वेळात सेटवरचा एक माणूस धावत माझ्याकडे आला आणि धोतर नेसा, धोतर नेसा असं घाईघाईत म्हणू लागला. त्याच्यामुळे मी आहे तसंच ते धोतर नेसलं आणि शॉट देण्यासाठी सेटवर गेलो. पण, माझं धोतर कॉस्ट्यूम वाल्यांनी एका लाकडाच्या खुंटीवर वाळण्यासाठी ठेवलं होतं. त्यामुळे या खुंटीवर असलेल्या सगळ्या मुंग्या त्या धोतरात शिरल्या. परिणामी, ज्या धोतरामध्ये जवळपास २ हजार मुंग्या होत्या. त्यांच्यासकट मी शूट करायला गेलो. इतकंच नाही तर जसं त्यांनी अॅक्शन म्हटलं त्याचवेळी या मुंग्यांनी मला एकत्रपणे शूट सुरु असताना मला चावायला सुरुवात केली." 

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा