Akshay Kumar: हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करणार्या कलावंतांमध्ये सध्या आघाडीवर असणारा खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.अक्षय कुमारलाबॉलिवूडमध्ये पदार्पण करून जवळपास ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. 'यह दिल्लगी', 'मोहरा', 'मै खिलाडी तू अनाडी', 'दिल तो पागल है', 'हेरा फेरी', 'खाकी', 'मुझसे शादी करोगी', 'नमस्ते लंडन', 'हे बेबी', 'भुल भुलय्या', 'सिंग इज किंग' असे सुपरहिट सिनेमे त्याने इंडस्ट्रीला दिले आहेत. नुकताच त्याचा जॉली एल एल बी-३ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. याचनिमित्ताने 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' शोमध्ये त्याने हजेरी लावली होती. त्यादरम्यान अभिनेत्याने अनेक मजेशीर किस्से शेअर केले.
सुरुवातीला ॲक्शनपट करणाऱ्या अक्षयने आता ॲक्शन-विनोद-थ्रिलर या जॉनरकडे आपला मोर्चा वळवला आहे .' जॉली एल एल बी-३' या कोर्टरुम ड्रामा सिनेमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याच शोदरम्यान अभिनेत्याने मुझसे शादी करोगी चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा शेअर केला.या चित्रपटाच्या शू्टिंगवेळी त्याला एका स्टेज शोसाठी २० लाख ऑफर आली होती. त्यादरम्यान,तो सेटवरून गायब झाला होता.तो मजेशीर किस्सा शेअर करताना अक्षय म्हणाला, "आम्ही फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत होतो. त्याचवेळी मला एका लग्नामध्ये स्टेज शो करण्याची ऑफर मिळाली. त्यासाठी मला २० लाख रुपये फीस मिळणार होती.फराह खानसोबत आमचं शूट चालू होतं. पण, मी त्यावेळी तिला हे सगळं सांगितंल असतं तर कदाचित तिने मला जाऊ दिलं नसतं."
पुढे अक्षय कुमारने सांगितलं की,"मी त्याचवेळी सलमानला सेटवर येताना पाहिलं. त्याला पाहून फराहला मी म्हणालो, आता सलमानचे थोडे शॉट्स शूट करुन घ्या. मी आता थकलोय. त्यानंतर मला व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करायला सांगितला. पण, मी माझ्या सिक्योरिटी गार्डसोबत बाईकवरुन एअरपोर्ट जवळ पोहोचलो, तिथेच ते लग्न होतं. मग फटाफट मी शो केला आणि चेक घेऊन परत निघालो. त्यानंतर पु्न्हा शूटिंगला सुरुवात केली." असा मजेशीर किस्सा अभिनेत्याने शेअर केला.