Join us

देओल कुटुंबावर शोककळा, बॉबी देओलच्या सासू मर्लिन अहुजा यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 18:18 IST

बॉबी देओलच्या पत्नीला मातृशोक, अभिनेत्याच्या सासूचं निधन

देओल फॅमिली ही बॉलिवूडमधील लोकप्रिय कुटुंबांपैकी एक आहे. सध्या देओल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलच्या सासू मर्लिन अहुजा यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांची प्रकृतीही खालावली होती. रविवारी(३ सप्टेंबर) संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

मर्लिन अहुजा या एक उद्योजिका होत्या. त्यांचे पती देवेंद्र अहुजा पेशाने बँकर होते. आईमुळेच बॉबी देओलची पत्नी तान्यालाही व्यवसायात रुची निर्माण झाली होती. जुर्म आणि नन्हे जैसलमेर या चित्रपटांसाठी तान्याने वेशभुषेची जबाबदारी सांभाळली होती. तान्याव्यतिरिक्त मर्लिन अहुजा यांना विक्रम आणि मुनीषा ही दोन मुले आहेत. मर्लिन अहुजा या मुंबईतच स्थायिक होत्या.

बॉबी देओल आणि तान्याने ३० मे १९९६ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांना आर्यमन आणि धरम ही दोन मुले आहेत. बॉबी आणि तान्या बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. आश्रम वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

टॅग्स :बॉबी देओलसनी देओलबॉलिवूड