Kartik Aaryan:कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) बॉलिवूडच्या मोस्ट टॅलेंटेड अॅक्टर्सपैकी एक आहे. सध्या अभिनेत्याची 'भूल भूलैया-3' मुळे सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्याचा हा सिनेमा दणक्यात कमाई करतोय. कार्तिक आर्यन त्याच्या अभिनयानेच नाही तर हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकतो. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कार्तिकच्या आईने त्याच्या स्वभावाबद्दल खुलासा केला आहे.
'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनच्या आई माला तिवारी यांनी त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला. कार्तिक लहापणी खूपच मस्ती करायचा. एकदा त्याच्या मस्तीमुळे बहिणीचा जीव धोक्यात आला होता. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, "तेव्हा कार्तिक जिज्ञासू होता. एकेदिवशी डिओड्रंटच्या बॉटलवर आगीचं चित्र पाहिलं. त्यानंतर खरंच आग लागते की नाही हे पाहण्यासाठी त्याचे प्रयोग सुरू झाले".
पुढे त्यांनी सांगितलं, "यासाठी कार्तिकने त्याची छोटी बहीण किट्टूची मदत घ्यायचं ठरवलं. त्याने तिला मेणबत्ती पेटवायला सांगितली आणि मेणबत्तीच्या आगीवर स्प्रे मारला. त्यामुळे किट्टूच्या केसांना आग लागली होती. पण, प्रसंगावधान दाखवत त्याने परिस्थिती हाताळली. त्यानंतर कार्तिकवर घरचे सगळे ओरडले होते". यावर स्वत: ची बाजू सावरताना कार्तिक म्हणतो, "तिचे केस जाळण्याचा माझा काही हेतू नव्हता. त्या घडल्या प्रकारानंतर आई माझ्यावर खूप रागावली होती".
कार्तिकने २०११ साली 'प्यार का पंचनामा' मधून एन्ट्री केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यानं करिअरमध्ये अनेक चढऊतार अनुभवले आणि शेवटी हवं ते मिळवलंच. कधीकाळी मुंबईत रिक्षा, टॅक्सीने फिरणाऱ्या कार्तिककडे आज लॅम्बॉर्गिनी, रेंज रोव्हरसारख्या गाड्या आहेत.