Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाईट अवस्था! छोट्या पडद्यावरची हिट मालिका पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू, कमाई फक्त ८० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:39 IST

गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या मालिकेच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्मात्यांनी मालिकेचा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणला खरा, पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी निर्मात्यांनी 'भाबीजी घर पर हैं! फन ऑन द रन' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आणला खरा, पण प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. टीव्हीवर सुपरहिट ठरलेली ही मालिका सिनेमाच्या पडद्यावर मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरली असून प्रदर्शनानंतरच्या पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाला साधी १ कोटी रुपयांची कमाई देखील करता आलेली नाही.

बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने आपल्या पहिल्या सोमवारी अत्यंत निराशजनक कामगिरी केली आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ २० लाख रुपयांची कमाई केली होती. शनिवारी आणि रविवारी सुट्ट्यांचे दिवस असूनही कमाईत मोठी वाढ झाली नाही. शनिवारी २० लाख आणि रविवारी ३० लाख रुपये कमावल्यानंतर सोमवारी चित्रपटाची कमाई थेट १० लाख रुपयांवर येऊन ठेपली आहे. अशा प्रकारे चार दिवसांनंतर चित्रपटाची एकूण कमाई केवळ ८० लाख रुपये झाली असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'फ्लॉप' ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

या चित्रपटात मालिकेतील मूळ कलाकार आसिफ शेख, रोहिताश्व गौड आणि शुभांगी अत्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी निर्मात्यांनी रवी किशन, निरहुआ आणि मुकेश तिवारी यांसारख्या मोठ्या स्टार्सनाही चित्रपटात सामील केले होते, तरीही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी झाली नाही. कमकुवत पटकथा आणि प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल असलेल्या उदासीनतेमुळे चित्रपट आपले बजेट वसूल करेल की नाही, याबाबत आता मोठी शंका निर्माण झाली आहे.

सामान्यतः अशा प्रकारच्या विनोदी चित्रपटांना प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादाची (Word of Mouth) गरज असते, मात्र चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांकडूनही फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. टीव्हीवर विनामूल्य उपलब्ध असलेले मनोरंजन मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी रस दाखवला नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता हा चित्रपट चित्रपटगृहात किती दिवस तग धरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : TV Hit 'Bhabiji Ghar Par Hai' Flops on Big Screen

Web Summary : The 'Bhabiji Ghar Par Hai' movie failed to impress at the box office. Despite a star cast, the film earned only ₹80 lakh in its first four days. Poor reviews and lack of audience interest led to its flop status. Its TV success didn't translate to cinema.
टॅग्स :बॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉक्स ऑफिस कलेक्शन