Join us

ऐश्वर्य ठाकरेच्या 'निशांची' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अनुराग कश्यपच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:40 IST

देसी स्वॅगचा तडका असलेल्या 'निशांची' ट्रेलर पाहिलात का?

सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली राजकीय कुटुंबांपैकी एक असलेल्या ठाकरे कुटुंबातील एक सदस्यानं राजकारणात नाही तर थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.  शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) हा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. त्याच्या 'निशांची' चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे अनुराग कश्यपनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. 'निशांची' हा एक अस्सल मसालापट आहे. 

२ मिनिटे ४९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये ऐश्वर्य ठाकरे दुहेरी भूमिकेत दिसतोय. त्यानं बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची भूमिका साकारली आहे. 'निशांची'च्या ट्रेलरमध्ये  अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी आणि कौटुंबिक भावनांचा सुरेख संगम पाहायला मिळतोय. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झालेत. या चित्रपटात वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद जीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अमेझॉन एमजीएम स्टुडिओज् इंडियाने निर्मित केलेला हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणाले, "अमेझॉन एमजीएम स्टुडिओज् इंडियासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. ऐश्वर्य, वेदिका, मोनिका, झिशान, कुमुद आणि संपूर्ण टीमने केवळ अभिनयच नाही, तर या पात्रांना जगले आहे. त्यांच्या कामातील तळमळ आणि प्रामाणिकपणा या चित्रपटात दिसून येतो". त्यांनी पुढे सांगितले की, चित्रपटाचे संगीत आणि कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

ऐश्वर्य गेल्या काही वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत काम करतोय. त्यानं संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. ऐश्वर्य हा  स्मिता ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे.  स्मिता ठाकरे हे सिनेइंडस्ट्रीतलं लोकप्रिय नाव आहे. स्मिता यांनी 'हसिना मान जाये' या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी मालिकांचीही निर्मिती केली आहे.

टॅग्स :अनुराग कश्यपबाळासाहेब ठाकरेसिनेमा