अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'बेबी जॉन' (Baby John) सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. शाहरुखला 'जवान'सारखा ब्लॉकबस्टर हिट देणाऱ्या दिग्दर्शक अॅटलीने सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात भाईजान सलमान खानचा कॅमिओही आहे. केवळ १० सेकंदात सलमानने स्क्रीप्ट न ऐकता या कॅमिओसाठी होकार दिला होता. हा किस्सा अॅटलीने नुकतंच एका मुलाखतीत सांगितला. तसंच सलमान सेटवर वाघासारखा बसून आमची वाट बघत होता असंही तो म्हणाला.
वरुण धवन, वामिका गब्बी, कीर्ती सुरेश आणि अॅटली 'बेबी जॉन' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सलमान खानच्या सिनेमातील कॅमिओबद्दल 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत अॅटली म्हणाला, "मुराद खेतानीसोबत माझी सुरुवातीपासूनच चर्चा सुरु होती. मला सिनेमाच्या शेवटी कॅमिओ हवा आहे. 'आपण सलमान खानला विचारुया का?' असं मी म्हणालो. तर खेतानी म्हणाले, 'ठीक आहे'. दुसऱ्या दिवशी खेतानी सरांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की सलमान खान कॅमिओसाठी तयार आहे. मला धक्काच बसला. मी म्हटलं, 'मला तुमच्यासोबत चर्चा करायची होती. मी काही खास सीनही तयार केलेला नाही. मला यावर आधी काम करु द्या.' तर मुराद खेतानी म्हणाले, 'सलमान लगेच तयार झाला आहे. मी त्याला बेबी जॉनसाठी कॅमिओचं विचारसं तर तो लगेच हो म्हणाला. कधी आणि कुठे यायचं कळवा असंही तो म्हणाला. अगदी १० सेकंदच आम्ही बोललो असू.'
अॅटली पुढे म्हणाला, 'सलमान खानची कमिटमेंट आणि वेळेचं पालन पाहून मी थक्क झालो. त्याला १ वाजताची वेळ दिली होती तर तो १२.३० वाजताच सेटवर हजर होता. मी स्वत: आणि इतर टीमही १ वाजता पोहोचली. तर सलमान वाघासारखा बसून आमची वाट पाहत होता. त्याचा फिल्ममेकर्सवर खूप विश्वास आहे हे पाहूनही मी थक्क झालो होतो. सलमानसोबत सीनबद्दल बोलूया का असं मी विचारलं तर तो म्हणाला,'तुम्ही सगळे आहात ना यार, मग मला सीन ऐकायची गरज नाही. तुम्ही जे सांगाल ते मी करेन.'
'बेबी जॉन' २५ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यानंतर अॅटली सलमानसोबत A6 सिनेमा बनवणार आहे. याच्या स्क्रीप्टचं काम पूर्ण झालं आहे. देशाला गर्व वाटेल असा हा सिनेमा असेल असंही अॅली म्हणाला. यामध्ये कमल हसन किंवा रजनीकांत यांचीही भूमिका असू शकते.