Join us

Anupam Kher : "हे तेच चेहरे..." अनुपम खेर यांनी 'द केरळ स्टोरी' ला विरोध करणाऱ्यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:04 IST

अनेक जणांनी सिनेमाला पाठिंबा दिलाय मात्र काही घटकांनी तीव्र विरोधही दर्शवला आहे.

सुदिप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमाला वाढता विरोध थांबण्याचे नावच घेत नाही. अनेक जणांनी सिनेमाला पाठिंबा दिलाय मात्र काही घटकांनी तीव्र विरोधही दर्शवला आहे. त्यातच पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यात सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. यावर आता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही मत व्यक्त केलं असून याची तुलना काश्मीर फाईल्सशी केली आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, "हे तेच लोक आहेत ज्यांनी काश्मीर फाईल्सला विरोध केला होता. हे तेच चेहरे आहेत जे अशा चित्रपटांना विरोध करतात. सीएए, शाहीन बाग, जेएनयू ला विरोध करणारे हे तेच चेहरे आहेत. हे तेच आहेत ज्यांनी काश्मीर फाईल्सवर टीका केली होती. मला त्यांचा हेतू माहित नाही आणि मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही."

तसंच 'द केरळ स्टोरी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे यावर अनुपम खेर म्हणाले,"मी सिनेमा अजून पाहिलेला नाही पण मला आनंद वाटतो की लोक असे चित्रपट बनवत आहेत जे वास्तव दाखवणारे आहे. आणि ज्यांना वाटतं की हे प्रचारासाठी केलं जात आहे तर ते त्यांना योग्य वाटेल अशा विषयांवर सिनेमा बनवण्यास स्वतंत्र आहेत. कोणीही त्यांना थांबवत नाहीए."

सुदिप्तो सेन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'द केरळ स्टोरी' सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी यांची मुख्य भूमिका आहे. तर विपुल शहा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच टीका सुरु झाली होती. केरळच्या ३२ हजार मुली गायब झाल्या आणि दहशतवादी संघटनांना जाऊन मिळाल्या असा दावा ट्रेलरमध्ये करण्यात आला होता.

टॅग्स :अनुपम खेरसिनेमाद काश्मीर फाइल्सबॉलिवूड