भारताने अखेर इतिहास रचलाय. जपानला मागे टाकत भारताचीअर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आता आपली अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. ही देशासाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. यामुळे जागतिक आर्थिक व्यासपीठावर देशाचे स्थान मजबूत झाले आहे. या यशाचं अनेकांनी कौतुक केलंय. यात कलाकारही मागे नाहीत. महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केलाय.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या X या अकाउंटवर (पुर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहलं, "जय हिंद. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, भारत... आणि अडीच-तीन वर्षांत तिसरा सर्वात मोठा देश बनेल". पुढे त्यांनी सर्व देशांच्या जीडीपीचा उल्लेख केला. यासोबतचं बिग बींनी अग्निवीरबाबत आणखी एक ट्विट करत अग्निवीरांना सलामही केला आहे. यामध्ये त्यांनी "अग्नवीर झिंदाबाद. भारत माता की जय, जय हिंद" असं लिहिलं.
अमिताभ बच्चन यांच्याआधी कंगना हिनंदेखील काल पोस्ट करत भारताच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला होता. तसेच तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं.
नीती आयोगानं काय म्हटलं?
नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी १० व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर "जर भारत आपल्या योजना आणि रणनीतींवर ठाम राहिल्यास पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल", अशी आशा व्यक्त केली. तसेच सध्याचे भू-राजकीय आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल असल्याचेही त्यांनी सांगितलं.सध्या फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत.
४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती...४ ट्रिलियन डॉलर्स म्हणजे किती असा प्रश्न सर्वांना पडला असणार. तर ४ ,००० अरब डॉलर. म्हणजेच भारतीय रुपयांत ४००,००० कोटी एवढे होतात.