Join us

"डॉक्टरांनी सांगितलं, यापुढे बसूनच पँट बदला"; बिग बींचा तब्येतीबद्दल मोठा खुलासा, चाहत्यांना काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:44 IST

८२ वर्षीय अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल मोठा खुलासा केलाय. याशिवाय डॉक्टर काय म्हणाले? याबद्दलही सर्वांना सांगितलं

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे वयाच्या ८२व्या वर्षीही कामात अतिशय व्यस्त आहेत. पण वाढत्या वयानुसार शरीरात होणाऱ्या बदलांवर त्यांनी नुकतेच एका ब्लॉगमध्ये भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले की, आता साधी कामे करण्यासाठीही त्यांना काळजी घ्यावी लागते. रविवारी आपल्या चाहत्यांना भेटल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी वय वाढल्यावर शरीराच्या होणाऱ्या तक्रारींबद्दल खुलेपणाने लिहिले आहे.

डॉक्टरांनी अमिताभ यांना दिला हा सल्ला

अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये सांगितलं की, त्यांचे डॉक्टर आता त्यांना छोट्या-छोट्या कामांसाठीही विशेष सल्ला देत आहेत. "डॉक्टरांनी मला सांगितले आहे की, पॅन्ट घालताना उभे राहू नका, खाली बसूनच पॅन्ट बदला, नाहीतर तुमचा तोल जाऊन तुम्ही पडू शकता. सुरुवातीला मला यावर विश्वास बसला नाही, पण नंतर कळले की डॉक्टर किती योग्य होते,"

यासोबतच त्यांनी सांगितले की, आता त्यांना घरातही ठिकठिकाणी हँडल्स बसवावे लागले आहेत. "साधे जमिनीवर झुकून एखादा कागद उचलण्यासाठीही मला आता आधार लागतो," असे ते म्हणाले. या गोष्टींवर कोणी हसले तरी, हे सत्य आहे की, वय वाढले की शरीराची गती आणि इतर अवस्था मंदावते, असं ते म्हणाले.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील बदलांबद्दलही सांगितले. आता त्यांची सकाळची दिनचर्या त्यांच्या कामापेक्षा औषधे, व्यायाम आणि योगावर अधिक अवलंबून आहे. एका दिवसासाठीही व्यायाम सुटल्यास त्याचा लगेचच शरीरावर परिणाम होतो, असे त्यांनी म्हटले. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शेवटी सांगितलं की, "प्रत्येकाला हे घडणार आहे. मी आशा करतो की हे कोणासोबत होऊ नये, पण एक दिवस हे नक्कीच होणार," असे सांगत सर्वांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय.

बिग बींचं वर्कफ्रंट

'कौन बनेगा करोडपती'च्या १७ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत असलेले अमिताभ बच्चन लवकरच 'सेक्शन ८४' आणि 'कल्की २८९८ एडी' च्या सिक्वेलमध्येही दिसणार आहेत. त्यांच्या या प्रामाणिक आणि भावनापूर्ण पोस्टमुळे त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत, पण त्याचवेळी त्यांच्या फिटनेस आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाचीही त्यांना जाणीव झाली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनआरोग्यहेल्थ टिप्सबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार