Akshaye Khanna: बॉलिवूड अक्षय खन्नाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेत्याने आजवर त्याच्या कारकीर्दीत चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. अक्षय खन्ना सध्या आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने रेहमान डकैत हा पाकिस्तानी डाकू साकारुन त्याने रसिक प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं आहे. परंतु, अक्षय खन्नाला त्याच्या कारकिर्दीत असे अनेक प्रोजेक्ट मिळाले,जे त्याच्या करिअरसाठी उत्तम संधी ठरू शकले असते. पण काही ना काही कारणांमुळे अभिनेत्याने ते नाकारले. यापैकी एक नाव म्हणजे खाकी सिनेमा.
अक्षय खन्नाचा प्रवास ‘हिमालय पूत्र’ पासून सुरू झाला आणि पुढे ‘बॉर्डर’, ‘ताल’, ‘दिल चाहता हैं’ तसेच हमराज सारख्या सुपरहिट चित्रपटांनी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.त्याची चॉकलेट हिरोची इमेज तर लोकांच्या मनात कोरलेलीच आहे, पण खलनायिकी रोलही त्याने तेवढ्याच ताकदीने निभावले.मात्र, तुम्हाला माहितीये का साल २००४ मध्ये आलेल्या खाकी या चित्रपटासाठी तुषार कपूर आधी अक्षय दिग्दर्शकाची पहिली पसंत होता. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं. पण, एका सीनमुळे अक्षय हा चित्रपट नाकारला होता, असं सांगण्यात येतं.
मिडिया रिपोर्टनुसार,अक्षय खन्नाला 'खाकी' चित्रपटात एका भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती.परंतु त्याने ती नाकारल्यानंतर ही भूमिका तुषार कपूरला पदरी पडली. अक्षय खन्नाने चित्रपटाची ऑफर नाकारण्यामागचं कारण म्हणजे एक सीन होता. तो सीन करण्यास अक्षयने नकार दर्शवला होता.कथेनुसार,सिनेमातअमिताभ बच्चन साकारत असलेल्या पात्राच्या कानशिलात मारायची असते. हा सीन अक्षयला पटला नाही. त्याला कोणाचाही ज्येष्ठ अनादर करायचा नव्हता, ना दुसऱ्या कोणी तसे केलेले त्याला पाहायचे होते. म्हणून अक्षयने ऑफर नाकारल्याचं म्हटलं जातं.