Join us

'हाऊसफुल ५' कसा वाटला? अक्षय कुमारने विचारलं, लोकांनी अभिनेत्याच्या तोंडावरच सांगितलं की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:31 IST

अक्षय कुमार मास्क लावुन थिएटरमध्ये 'हाऊसफुल ५' सिनेमा पाहणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला गेला. तेव्हा लोकांनी काय प्रतिसाद दिला बघा

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'हाऊसफुल ५' सिनेमा थिएटरमध्ये नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. 'हाऊसफुल ५'सिनेमात मास्क मॅन पाहायला मिळत आहे. त्यामुळे सिनेमातील कलाकारही चेहऱ्यावर मास्क लावून विविध ठिकाणी प्रमोशनसाठी जात आहेत. अशातच अक्षय कुमारने एका थिएटरबाहेर मास्क लावून एन्ट्री घेतली. तेव्हा काय घडलं, जाणून घ्या

'हाउसफुल ५'च्या स्क्रीनिंगला अक्षय मास्क लावून गेला अन्...

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार तोंडावर मास्क लावून लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायला गेला. मास्कआड अक्षय कुमार आहे हे लोकांना कळलंच नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांच्या प्रामाणिक प्रतिक्रिया दिल्या. काही प्रेक्षक 'हाऊसफुल ५' पाहून उदास चेहऱ्याने काही न बोलता निघून गेले. तर काही प्रेक्षकांनी सिनेमा आवडला असल्याचं सांगून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. अक्षयने जास्तीत जास्त प्रेक्षकांना विचारण्याचा प्रयत्न केला. अक्षयने प्रमोशनसाठी वापरलेली ही नवी आयडिया अनेकांना आवडली.

'हाऊसफुल ५'ची कमाई किती

'हाऊसफुल ५'च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, पहिल्या दिवशी चित्रपटाने २४ कोटी रुपये कलेक्शन केलं. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने मोठी कमाई केली आणि ३० कोटी रुपये कमावले. 'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार, चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ०.०४ कोटी कलेक्शन केले. हे सुरुवातीचे आकडे आहेत आणि ते आणखी वाढतील. अंतिम आकडे संध्याकाळपर्यंत जाहीर होतील. चित्रपटाची एकूण कमाई ५४.०४ कोटी झाली आहे. दरम्यान, या फ्रँचायझीच्या शेवटच्या ४ चित्रपटांच्या रेकॉर्डवरून हा पाचवा भाग हिट होईल असे दिसून येत आहे.

टॅग्स :अक्षय कुमाररितेश देशमुखनाना पाटेकरहाउसफुल 4अभिषेक बच्चन