अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) समाजकारणात नेहमी पुढे असतो. लोकांच्या मदतीला तो कायम धावून जातो. सध्या पंजाबमध्येपूरामुळे परिस्थिती वाईट झाली आहे. ४३ लोकांचा जीवही गेला आहे. २३ जिल्ह्यातील हजारो गाव पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. सामान्य लोक, सेलिब्रिटी सगळेच पंजाबसाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आपल्या लोकांसाठी म्हणजे पंजाबसाठी धावून आला आहे. त्याने पंजाबसाठी तब्बल ५ कोटींची मदत पुढे केली आहे.
अक्षय कुमारने पंजाबसाठी ५ कोटींची मदत देण्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, "माझे यासंदर्भातील विचार ठाम आहेत. हो, मी पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी, त्यांच्या साधनसामग्री खरेदीसाठी ५ कोटी देत आहे. हे दान नाही.'दान' देणारा मी कोण? जेव्हाही मला मदतीचा हात पुढे करण्याची संधी मिळते मी स्वत:ला धन्य समजतो. माझ्यासाठी हीच सेवा आहे एक छोटं योगदान आहे. पंजाबमधील माझे सर्व बंधू आणि भगिनींवर आलेलं हे संकट लवकरात लवकर टळो हीच मी प्रार्थना करतो. देव दया करो."
देशात कुठेही संकट आलं तेव्हा अक्षय कुमार कायम उभा राहिला आहे. गरजुंसाठी, पीडितांसाठी नेहमीच मोठी मदत केली आहे. चेन्नईत आलेला पूर असो, कोव्हिड असो किंवा भारतीय सैनिकांच्या परिवारासाठी असो त्याने दरवेळी योगदान दिलं आहे. म्हणूनच अक्षय कुमारचं खूप कौतुक होतं.
अक्षय कुमारशिवाय दिलजीत दोसांझ, सोनू सूज, रणदीप हुड्डा, करण औजला या सेलिब्रिटींनीही मदतीचा हात पुढे केला आहे. तसंच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांचा सिनेमा 'मेहर'ची पहिल्या दिवसाची कमाईही मदतीसाठी देणार अशी घोषणा केली आहे.