सध्या अक्षय कुमारची (akshay kumar) प्रमुख भूमिका असलेल्या 'केसरी २' सिनेमाची (kesari 2 movie) सर्वांना उत्सुकता आहे. अक्षयचा हा आगामी भारतात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारीत आहे. जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यावर कोर्टात जी सुनवाई करण्यात आली, त्यावर हा सिनेमा आधारीत आहे. त्यावेळी सी. शंकरन नायर यांनी निष्पाप बळी गेलेल्या माणसांच्या बाजूने हा खटला लढवून ब्रिटीश अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. त्यांचीच दमदार भूमिका अक्षय कुमार साकारताना दिसणार आहे. यानिमित्त अक्षयने सर्व चाहत्यांना एक भावनिक विनंती केली आहे.
अक्षयने सर्वांना केली भावनिक विनंती, काय म्हणाला
'केसरी २' सिनेमाच्या रिलीजपूर्वी अक्षय कुमार सर्वांना विनंती करत म्हणाला की, "मी आपल्याला मनापासून विनंती करतो की 'केसरी 2' चित्रपट पाहताना कृपया आपला फोन खिशात ठेवा. प्रत्येक संवाद ऐका आणि समजून घ्या, कारण त्या संवादांमध्ये इतिहासाची प्रेरणा आहे. जर तुम्ही सिनेमादरम्यान इंस्टाग्राम स्क्रोल करत असाल, तर ते या चित्रपटाचा आणि त्यातील ज्वलंत कथेचा अपमान ठरेल. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी देशाच्या शौर्यगाथांचा सन्मान करावा, आणि त्यातून काहीतरी शिकावं.'केसरी 2' मध्ये ऐतिहासिक संदर्भ असलेले अनेक प्रसंग आणि संवाद असून, त्यांना पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे", असं अक्षयचं म्हणणं आहे.
'केसरी २' सिनेमाबद्दल...
'केसरी २' मध्ये अक्षय कुमार आणि माधवन वकिलाच्या भूमिकेत आहेत. अक्षय सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहे जे प्रसिद्ध वकील आणि काँग्रेसचे नेते होते. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडामागचं तथ्य समोर आणलं होतं आणि ब्रिटीश सरकारविरोधात कोर्टात हिंमतीने लढाई लढली होती. तर माधवन ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे वतील नेविल मॅककिनले यांची भूमिका साकारत आहे. अनन्या पांडे युवा वकील दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने सिनेमाची निर्मिती केली आहे.