सध्या 'सिंघम अगेन' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात अजय देवगण - अक्षय कुमार यांची सिंघम आणि सूर्यवंशीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ऑफस्क्रीनही मित्र असलेले हे दोन कलाकार आता पुन्हा एकदा आगामी सिनेमासाठी एकत्र येत आहेत. पण यावेळी कहानी में ट्विस्ट असा आहे की, अजय देवगण दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून अक्षय कुमार सिनेमात प्रमुख भूमिकेत अभिनय करताना दिसणार आहे. अशातच मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमा आणखी एक लोकप्रिय सुपरस्टार झळकणार आहे. त्याचं नाव विकी कौशल.
अजय-अक्षयसोबत झळकणार विकी कौशल
अजय देवगण - अक्षय कुमार यांच्या सिनेमात आता विकी कौशलची वर्णी लागल्याची चर्चा आहे. हा सिनेमा कॉमेडी असणार असून अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अनेक वर्षांनी अजय देवगण दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. आता या सिनेमात अक्षयसोबत विकी कौशल कॉमेडी करताना दिसणार आहे. त्यामुळे अजय-विकी-अक्षय हे त्रिकूट एकत्र आल्यावर काय धमाल घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अजूनतरी याबद्दल कोणताही अधिकृत खुलासा आला नसला तरी ही बातमी बाहेर आल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला आहे.
या दिवशी रिलीज होणार सिनेमा
सध्या तरी या सिनेमाची चर्चा अजूनतरी प्राथमिक स्तरावर आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरु होईल. कारण सध्यातरी अक्षय कुमार इतर सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय विकी कौशल या सिनेमाशी जोडला जाणार की नाही हे येणाऱ्या काळात कळून येईलच. शूटिंग सुरु झाल्यावर २०२६ मध्ये सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या विकी कौशलच्या 'छावा'ची सर्वांना उत्सुकता आहे.