Shubha Khote: मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते विजू खोटे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका अजरामर केल्या. मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील कालिया पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. विजू खोटेंप्रमाणे त्यांची बहिण शुभा खोटे हे देखील इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्या दोघांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत शुभा यांनी लाडक्या भावासोबतच्या बॉण्डिंगविषयी भरभरुन बोलल्या.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शुभा खोटे यांनी विजू खोटे आणि त्यांच्या बॉण्डिंगबद्दल त्या म्हणाल्या, "मला भाऊ पाहिजे होता आणि त्यासाठी मी देवाकडे कायम प्रार्थना करायचे. माझ्या जन्मानंतर तो सव्वा पाच वर्षांनी झाला. लहानपणी मी त्याला जीवापाड जपायचे. अगदी शाळेत जातानाही मी त्याला प्रोटेक्ट करायचे. पण, आम्ही मस्ती देखील खूप करायचो. मुळात तो स्वभावाने गरीब होता."
पुढे त्या म्हणाल्या, " आम्ही कुठे बाहेरगावी जात असलो तर एकमेकांना फोन लावून सांगायचो. अगदी शेवटपर्यंत आमचा संवाद चालू होता. एखादा प्रॉब्लेम असला तरी आम्ही एकमेकांसोबत बोलायचो. अजूनही मालिका वगैरे बघताना तो समोर दिसला तरी मला खूप त्रास होतो. त्याच्याशिवाय मला कोणीच नव्हतं. आता फक्त माझी मुलगी आहे. जे माझं रक्ताचं नातं आहे. "
विजू खोटेंच्या आजारपणाबद्दल बोलताना शुभा झाल्या भावुक
"तेव्हा मला आता बरं वाटत नाहीये, मी लवकरच जाणार असं तो बोलायचा. मी म्हणायचे असं बोलू नको तुझ्याशिवाय माझं कोणीही नाही. अखेरच्या दिवसात त्याला खूप त्रास सहन करावा लागला. डायबिटीस झालं होतं. हार्टचं ऑपरेशन झालं आणि मग त्याच्या किडनीत पाणी झालं हे शेवटच्या दिवसात खूपच वाढलं. काही खात नसल्यामुळे मी त्याला भेटायला गेले. मला आठवतंय, तेव्हा शेवटचं त्याने काहीतरी खाल्ल असेल. त्याला म्हटलं लवकरच बरा हो आपल्याला गोव्याला जायचं आहे. कधी असं वाटलं नाही तो इतक्या लवकर जाईल. " या मुलाखतीत आपल्या भावाबद्दल बोलताना शुभा खोटे भावुक झाल्या.