Ridhi Dogra : गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान (Fawad Khan) मुख्य भूमिकेत असलेल्या 'अबीर गुलाल' चित्रपटाची बरीच चर्चा झाली. हा चित्रपट ९ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु, जम्मु-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर या चित्रपटाला भारतात प्रदर्शनास बंदी घालण्यात आली. दरम्यान,या चित्रपटात फवाद खानसहवाणी कपूर तसेच अभिनेत्री रिद्धी डोगरा (Ridhi Dogra) देखील मुख्य भूमिकेत होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर, रिद्धी डोग्राला पाकिस्तानी अभिनेता फवादसोबत काम केल्याबद्दल खूप ट्रोल करण्यात आलं. यावर आता रिद्धीने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
अलिकडेच अभिनेत्री रिद्धी डोगराने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तिला आलेल्या एका वाईट अनुभवाबद्दल सांगितलं. त्यादरम्यान, अभिनेत्रीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, "अरे, हिने फवाद खानसोबत काम केलं आहे, असं लोक म्हणू लागले. पण, मी ट्रोलिंगचा खंबीरपणे सामना केला. मला धमक्या देण्यात आल्या, भीती दाखवण्यात आली. मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच या देशाची नागरिक आहे. मी कोणताही अपराध केलेला नाही आणि आज, जेव्हा आपण या परिस्थितीत आहोत, तेव्हा मला माझ्या देशासोबत,भारतीय सैन्याला पाठींबा देणं मला गरजेचं वाटतं. शिवाय मी हे एक सेलिब्रिटी वगैरे आहे म्हणून करत नाहीये, तर तुम्ही सर्वजण खास आहात म्हणून करत आहे."
रिद्धी डोगरा ही मुळची जम्मु मधील आहे. पलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर तिचे कुटुंबीय आणि काही नातेवाईक अमृतसरमध्ये अडकले होते. त्यामुळे अभिनेत्री प्रचंड टेन्शमनध्ये होती असंही तिने मुलाखतीमध्ये म्हटलं. त्या दिवसांबद्दल रिद्धीने सांगितलं. "तेव्हा मी फक्त प्रार्थना करत होतो आणि रडत होतो. सीमेवर तैनात असलेल्या आपल्या सशस्त्र दलांबद्दलही मला कृतज्ञता वाटली. तो खूप कठीण काळ होता."असा खुलासा अभिनेत्रीने केला.