Join us

मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:51 IST

मैत्रिणीच्या नवऱ्याशी अभिनेत्रीने लग्न केलं होतं. पण आता ३ वर्षातच ही अभिनेत्री घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे

बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोट घेणार अशी चर्चा आहे. या अभिनेत्रीने ३ वर्षांपूर्वीच एका गर्भश्रीमंत उद्योगपतीशी लग्न केलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील गाजवणारी हंसिका मोटवानी. हंसिका आणि तिचा पती सोहेल खटूरिया यांच्या वैवाहिक आयुष्यात सध्या तणाव निर्माण झाला असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. दोघांनी डिसेंबर २०२२ मध्ये जयपूरमध्ये लग्न केले होते. आता लग्नाला तीन वर्ष होत असतानाच ते वेगळं राहू लागल्याचं समजत असून ते एकमेकांशी घटस्फोट घेणार असल्याची चर्चा निर्माण झाली आहे. 

हंसिका पतीपासून घेणार घटस्फोट

मीडिया रिपोर्टनुसार हंसिका सध्या तिचा पती सोहेलपासून वेगळी राहत असून ती आईसोबत राहायला गेली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितलं जातं की, दोघांमध्ये मतभेद वाढले आहेत आणि त्यामुळे दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना हंसिकाचा पती सोहेलने माध्यमांना फक्त इतकंच सांगितलं की, “ही बातमी खोटी आहे.” मात्र त्याने हंसिकासोबत राहतोय की नाही, यावर कोणतंही स्पष्ट स्पष्टीकरण दिलं नाही.

हंसिकानेही अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावर तिने पतीसोबतचे काही फोटो डिलीट केल्याचं समजतंय. त्यामुळेच या चर्चांना अजूनच उधाण आलं आहे. हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नावेळीही वाद झाले होते. कारण सोहेलचे हे दुसरं लग्न आहे, आणि त्याची पहिली पत्नी हंसिकाची जवळची मैत्रीण होती. हंसिकाने जवळच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच संसार थाटल्याने त्यांच्या नात्याविषयी सुरुवातीपासूनच उलटसुलट चर्चा झाल्या होत्या.

सध्या हंसिका आणि सोहेल वेगळं राहतात का, खरंच त्यांच्या नात्यात दुरावा आलाय का, यावर अधिकृतपणे दोघांकडून काहीही सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत सत्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

टॅग्स :हंसिका मोटवानीलग्नघटस्फोटबॉलिवूडटेलिव्हिजन