Join us

"रात्रीचे दोन वाजले होते अन्..." रणवीर सिंगसोबत छाया कदम यांची अशी झाली होती पहिली भेट; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 12:59 IST

आपल्या सहज सुंदर अभिनयाने छाया कदम यांनी कलाविश्वात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

Chhaya Kadam: 'सैराट', 'झुंड','न्यूड'  ते ‘मडगाव एक्स्प्रेस’ची कंचन कोंबडी असो किंवा ‘लापता लेडीज’ मधील मंजू माई यांसारख्या व्यक्तिरेखा साकारून आपल्या सहज सुंदर अभिनयाने छाया कदम (Chhaya Kadam)यांनी कलाविश्वात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांचं नाव आज देशभरात गाजत आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान, नुकत्याच छाया कदम यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणवीर सिंगसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला. 

अभिनेत्री छाया कदम यांनी अमोल परचूरे यांच्या 'कॅचअप' मराठीला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत त्यांची पहिली भेट कशी झाली? याबद्दलची आठवण त्यांनी शेअर केली आहे. दरम्यान या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मला रणवीर सिंगचं तेव्हा खूप कौतुक वाटलं. आतापर्यंत मी त्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं त्याची एनर्जी, स्टाईल पण तेव्हा प्रत्यक्षात त्याला पाहिलं. त्या दिवशी रात्रीचे साधारण दोन-अडीच वाजले होते आणि थंडीही प्रचंड होती. 'गंगूबाई काठियावाडी'मधील ढोलीडा गाण्याचं शूट चाललं होतं. भन्साळी सरांचं शूट म्हणजे तेव्हा खूप डान्सर, मेकअप आर्टिस्ट अशी बरीच माणसं सेटवर होती. आमचा जो सर्कल होता त्यांचं शूट थांबलं होतं. त्यानंतर मी एका कोपऱ्यात  जाऊन पाठमोरी खूर्चीवर बसले होते. त्याठिकाणी दुसरा एक सर्कल होता तिथे आलियाचं शूट चालू होतं. तेव्हा अचानक मुलींचा आवाज ऐकू आला. मी विचार केला की हा कसला आवाज येतोय? तेव्हा सेटवरील स्पॉट दादांनी मला सांगितलं की रणवीर सिंग आला आहे. त्यामुळे आता थोडा वेळ शूटिंग थांबेल कारण तो सगळ्यांना भेटेल हाय, हॅलो करेल, असं ते म्हणाले."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "त्यानंतर मी मागे वळून पाहिलं तर त्याची थोडी झलक दिसली. परत काही वेळाने तिकडे बघितलं तर तो आलियासोबत बोलताना दिसला त्यानंतर तो संजय सरांसोबत बोलत होता. मग पुन्हा मुलींचा आवाज ऐकू आला. तेव्हा मला जाणवलं की तो खरंच आपल्याकडे चालत येतोय. बघते तर काय तो खरंच मला भेटायला आला. तेव्हा रणवीर माझ्यासमोर आला आणि म्हणाला, छाया मॅम, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मी जेव्हापासून इथे आलो आहे संजय सर तुमच्याबद्दल बोलत आहेत. मला या गोष्टीवर विश्वासच बसेना. थंडी असल्यामुळे मी शॉल घेऊन उभी होती. त्यामुळे त्यानेच शॉलमधून माझा हात काढला आणि हस्तांदोलन केलं आणि तो निघून गेला. नंतर मला वाटलं यार, हे किती भारी आहे!"

टॅग्स :सेलिब्रिटीरणवीर सिंगबॉलिवूडसिनेमा