Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमार व सोनू सूद हेच खरे देशभक्त, दोघांनाही द्या भारतरत्न ! सोशल मीडियावर नेटक-यांची नवी मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 11:00 IST

ट्विटरवर सध्या भारतरत्न ट्रेंड होताना दिसत आहे.

ठळक मुद्दे सोनू सूद याने तर स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अक्षरश: जीवाचे रान केले होते.

कोरोना विषाणूने  संपूर्ण देशात थैमान घातले आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे आलेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपआपल्या परीने गरजूंना मदतीचा हात दिला. अक्षय कुमारने पीएम फंडात 25 कोटींची मदत दिली. इंडस्ट्रीतील हातावर पोट असणा-या शेकडो कलाकारांना आर्थिक मदत केली. पीपीई किट्स वाटल्या. तर सोनू सूदने हजारो स्थलांतरीत मजुरांना आपआपल्या गावी सुरक्षित पोहोचवले. लॉकडाऊन काळात या दोन्ही स्टार्सच्या कामाची दखल आता नेटक-यांनी घेतली असून  या दोघांना भारतरत्न  देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर या मागणीने जोर धरला आहे.

सध्या ट्विटरवर अक्षय कुमार आणि सोनू सूद यांचा फोटो शेअर करून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक नेटक-यांनी ही मागणी उचलून धरली आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात मागणी केली आहे. यामुळे ट्विटरवर सध्या भारतरत्न ट्रेंड होताना दिसत आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना पीएम केअर फंडसाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अक्षय कुमारने लगेच पीएम केअर फंडसाठी 25 कोटींची मदत केली होती. याशिवाय अक्षय कुमारने मुंबई महानगरपालिकेला मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत केली होती. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेकडो कलाकारांच्या खात्यात रोख रक्कमही त्याने जमा केली होती.

अभिनेता सोनू सूद याने तर स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अक्षरश: जीवाचे रान केले होते. अचानक लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे देशातील विविध राज्यात अनेक मजूर अडकले होते. या मजूरांच्या मदतीसाठी सोनू सूद धावून आला होता. सोनू सूदने देशात विविध ठिकाणी अडकलेल्या  मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष बस तसेच विमानांची व्यवस्था केली. त्याच्या या सामाजिक कायार्मुळे नेटीझन्स भारावून गेले होते.

 

 

टॅग्स :अक्षय कुमारसोनू सूद