Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेल्या वजनावरुन राजकुमार रावची लोकांनी उडवली खिल्ली; पत्नी पत्रलेखा स्पष्टच म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:43 IST

अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात राजकुमारचे वाढलेले वजन आणि बदललेली हेअरस्टाईल पाहून सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. या सर्वात राजकुमारची पत्नी पत्रलेखाची पोस्ट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या आगामी चित्रपटांसाठी केलेल्या शारीरिक बदलांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात राजकुमारचे वाढलेले वजन आणि बदललेली हेअरस्टाईल पाहून सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र, आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री पत्रलेखा हिने या ट्रोलर्सना चोख उत्तर देत आपल्या पतीच्या मेहनतीचे समर्थन केले आहे.

काय म्हणाली पत्रलेखा?

पत्रलेखाने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर करत राजकुमारचे कौतुक केले आहे. तिने लिहिले की, "राजकुमार, मला तुझा अभिमान आहे. तू स्वीकारलेल्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी स्वतःला झोकून देतोस. एखादा कलाकार एखाद्या पात्रात शिरण्यासाठी किती मेहनत घेतो आणि त्या प्रक्रियेतून जाताना त्याला किती त्रास होतो, हे जगाला दिसत नाही. प्रेक्षकांना फक्त पडद्यावरचा अंतिम निकाल दिसतो जो खूप सोपा वाटतो. पण या प्रसिद्धी आणि ग्लॅमरच्या मागे कलाकाराचे रक्त, घाम, अश्रू आणि त्याचं वैयक्तिक समर्पण असतं."

राजकुमार रावचे स्पष्टीकरण

वाढलेल्या वजनावरून होणाऱ्या चर्चेनंतर राजकुमारने स्वतः सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सांगितले की, हा बदल त्याच्या आगामी 'निकम' (Nikam) या बायोपिकसाठी आहे, जो ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित आहे. या भूमिकेसाठी त्याला ९ ते १० किलो वजन वाढवावे लागले. राजकुमार म्हणाला, "जोपर्यंत मी स्वतःच्या मेहनतीने तो लूक मिळवू शकतो, तोपर्यंत माझा प्रोस्थेटिक्सवर विश्वास नाही. 'निकम'साठी मी दिवसाला दोन पिझ्झा, भरपूर मिठाई, आलू पराठे आणि बिर्याणी खात होतो."

राजकुमारने पुढे असेही सांगितले की, 'निकम'चे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता तो हे वाढलेलं वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्याला लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या बायोपिकवर काम करायचं आहे. 'ट्रॅप्ड' सिनेमासाठी वजन कमी करणे, 'बोस' वेबसीरिजसाठी अर्धे केस काढणे आणि 'श्रीकांत'साठी स्वतःच्या अभिनयात केलेला बदल, यामुळे राजकुमार राव प्रत्येक भूमिकेसाठी किती मेहनत घेतो, हे दिसून आलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajkummar Rao Trolled for Weight Gain; Wife Patralekhaa Defends Him

Web Summary : Rajkummar Rao faced criticism for his weight gain due to his role in the biopic 'Nikam'. His wife, Patralekhaa, defended him, praising his dedication to his roles and the hard work involved. Rao is now working on losing weight for his next role.
टॅग्स :राजकुमार रावपत्रलेखाबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार