Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुपरस्टार'चा सन्मान! ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 10:47 IST

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे (mithun chakroborty)

'डिस्को डान्सर' या नावाने लोकप्रिय असलेले बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय. ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन ही घोषणा केलीय. मनोरंजन विश्वासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

या दिवशी होणार मिथुन चक्रवर्तींचा सन्मान

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट करुन ही घोषणा केलीय. यात त्यांनी लिहिलंय की, "आम्हाला ही घोषणा करुन अत्यंत आनंद होत आहे की, दादासाहेब फाळके पुरस्कारांसाठी ज्युरींनी दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तींची निवड केलीय. मिथुन चक्रवर्तींनी सिनेमाक्षेत्रात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ऑक्टोबरला होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्तींचा हा खास सन्मान केला जाणार आहे."

मिथुन चक्रवर्तींची फिल्मी कारकीर्द

मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. कोलकातामधील बंगाली हिंदू कुटुंबात मिथुन यांचा जन्म झाला. पुण्यातील FTII मधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय. मृणाल सेन दिग्दर्शित 'मृग्या' या सिनेमातून मिथुन चक्रवर्तींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'डिस्को डान्सर' या सिनेमात मिथुन यांनी केलेला अभिनय आणि डान्स चांगलाच गाजला. या सिनेमातून 'डिस्को डान्सर' नावाने मिथुन यांना ओळखलं जाऊ लागलं. मिथुन यांनी अभिनयक्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रही गाजवलंय. सध्या ते भारतीय जनता पार्टीत सक्रीय आहेत.

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूड