Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेटवर लागलेल्या आगातील 80 टक्के भाजला अभिनेता, 6 महिने रुग्णालयात राहून झाला दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 11:28 IST

Bollywood actor: या आगीत ते इतके होरपळले की उपचार करुनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.

भारतीय सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली. यात ६०-७० च्या काळातील असेही काही कलाकार आहेत ज्यांची चर्चा आजही इंडस्ट्रीत होते. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे मनमोहन. खलनायिकी भूमिका साकारुन मनमोहन यांनी ६०चा काळ गाजवला. त्यांच्या अनेक भूमिका त्या काळी गाजल्या. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या या अभिनेत्याचा अंत मात्र, अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाला.

मनमोहन यांनी ६० च्या दशकात त्यांच्या करिअरची सुरुवात केली. आणि, ७० च्या दशकापर्यंत ते लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत जाऊन बसले. उत्तम अभिनय कौशल्यामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय झाले.यात खासकरुन त्यांच्या खलनायिकी भूमिका गाजायच्या. त्यामुळे त्यांना सिनेमात घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते उत्सुक असायचे. विशेष म्हणजे अभिनयावर प्रेम करणाऱ्या या अभिनेत्याचा शेवटही सिनेमाच्या सेटवरच झाला. सेटवर लागलेल्या आगीमध्ये ते जळून मृत्युमुखी पडले.

आगीमध्ये सापडले मनमोहन

महाराष्ट्रातील एका गावामध्ये मनमनोहन यांच्या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत मनोज कुमार स्क्रीन शेअर करत होते. ज्या गावात या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होतं त्या गावात वीज नव्हती. गावात लाइट नसल्यामुळे सिनेमाची टीम रात्रीच्या वेळी तंबूमध्ये पेट्रोमॅक्स लॅम्प लावून झोपायचे. मनमोहन यांनीही त्यांच्या तंबूमध्ये पेट्रोमॅक्स लॅम्प लावला होता. मात्र, रात्री अचानकपणे या लॅम्पचा स्फोट झाला आणि त्यांचा सगळा तंबू जळू लागला.

आगीमध्ये होरपळले मनमोहन

त्यामुळे तंबूला लागलेल्या आगीच्या झळा मनमोहन यांच्यापर्यंतही पोहोचल्या. त्यावेळी मनमोहन यांनी सिल्कचा कुर्ता आणि लुंगी परिधान केली होती. ज्यामुळे आगीने त्यांच्याभोवती पटकन पेट घेतला. या आगीमध्ये ते जवळपास ८० टक्के भाजले.

६ महिने रुग्णालयात उपचार तरीही झाला अंत

आगीमध्ये होरपळून निघाल्यामुळे मनमोहन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. जवळपास ६ महिने ते रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, असंख्य प्रयत्न करुनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. १९७९ मध्ये वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमामहाराष्ट्र