९० च्या दशकातील गाजलेला चित्रपट 'रंगीला' लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. हा चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यात आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आता ३० वर्षांनी हा चित्रपट 'अल्ट्रा रिवाइंड' उपक्रमांतर्गत ४K रेझोल्यूशन आणि डॉल्बी साऊंडमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या बातमीची पुष्टी केली आहे. त्यांनी लिहिले, 'रंगीला ४K डॉल्बीमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे. आमिर खान, जॅकी श्रॉफ, उर्मिला मातोंडकर आणि ए.आर. रहमान यांचे अभिनंदन. 'रंग' पुन्हा परत येत आहेत.' या घोषणेमुळे ९० च्या दशकातील प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच नव्या पिढीलाही हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
'रंगीला' हा त्या काळातील एक सुपरहिट चित्रपट आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच यश मिळवले नाही. तर संगीत, फॅशन आणि कथेच्या बाबतीतही एक नवा ट्रेंड सेट केला. ए.आर. रहमान यांचे संगीत हे या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. 'रंगीला रे', 'तनहा तनहा', 'क्या करे क्या ना करे' यांसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाची कथा एका सामान्य मुलीची (मिली) आहे, जी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहते. तिच्या या प्रवासात तिला तिचा लहानपणीचा मित्र (मुन्ना) साथ देतो. त्याचवेळी एक प्रसिद्ध अभिनेता राज कमल, मुन्ना आणि मिलीच्या प्रेमाचा त्रिकोण दिसतो. राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाने आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही कथा प्रभावीपणे सादर केली आहे. चित्रपटाच्या ३० वर्षांच्या पूर्ततेच्या निमित्ताने आणि रि-रिलीजच्या निमित्ताने हा चित्रपट जुन्या आठवणींना उजाळा देईल, अशी अपेक्षा आहे.