Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:10 IST

आमिरने एका सिनेमात अभिनेत्रीच्या वडिलांची तर दुसऱ्या सिनेमात बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती.

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या 'सितारे जमीन पर' सिनेमामुळे चर्चेत आहे. आमिर आणि सिनेमातील सर्व मुलांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. २०२२ साली आलेल्या 'लाल सिंह चड्डा'च्या अपयशानंतर आमिर खान खूपच दु:खी होता. मात्र आता त्याने दमदार कमबॅक केलं आहे. सिनेमात आमिरने दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या निमित्ताने आमिरने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आणि आपल्या करिअरमधी, वैयक्तिक आयुष्यातील वेगवेगळे पैलू उलगडले. नुकतंच त्याने एका मुलाखतीत अभिनेत्री फातिमा सना शेखसोबतच्या (Fatima Sana Shaikh) नात्यावर भाष्य केलं.

आमिर खानच्या 'दंगल' सिनेमात फातिमा सना शेखची मुख्य भूमिका होती. नंतर तिने त्याच्याच 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' सिनेमात काम केलं जो जोरदार आपटला. तर दुसरीकडे फातिमा आणि आमिरच्या अफेअरची चर्चा रंगली होती. आमिर २७ वर्ष लहान अभिनेत्रीला डेट करतोय अशी अफवा पसरली होती. नुकतंच 'लल्लंनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, "ठग्स ऑफ हिंदुस्तानसाठी मी आधी आलिया भट, श्रद्धा कपूर, दीपिका यांना ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला होता. म्हणून फातिमाला कास्ट करावं लागलं. दिग्दर्शकाला फातिमाला कास्ट करायचं नव्हतं कारण दंगलमध्ये तिने माझ्या मुलीची भूमिका साकारली होती. तर ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये मी तिचा बॉयफ्रेंड असणार होतो. शेवटी दिग्दर्शकाने स्क्रीप्टमधून आमचे रोमँटिक सीन्सच हटवण्याचा निर्णय घेतला."

फातिमासोबतच्या नात्यावर आमिरची प्रतिक्रिया

तो पुढे म्हणाला, "पण माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही. मी खरोखर थोडीच तिचा बाप किंवा बॉयफ्रेंड आहे. आम्ही सिनेमा बनवतोय भाई. अमिताभ बच्चन आणि वहीदा रहमान यांनी सुद्धा आई-लेकाची आणि दुसऱ्या सिनेमात बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. मी खरोखर तिचा वडील आहे असं समजायला प्रेक्षक काही वेडे नाहीत. आपण जर असा विचार करत असू तर आपण प्रेक्षकांना कमी लेखत आहोत."

टॅग्स :आमिर खानफातिमा सना शेखबॉलिवूडरिलेशनशिप