बॉलिवूडमध्ये लवकरच एक नवीन मराठमोळा चेहरा डेब्यू करतोय. हा काही सर्वसामान्य घरातील चेहरा नाही तर राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्या एका मोठ्या मराठामोळ्या कुटुंबातील आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्या ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या 'निशांची' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. नुकताच अनुराग कश्यपचा वाढदिवस असल्याने ऐश्वर्यने त्याच्यासाठी एक अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.
ऐश्वर्यने अनुराग कश्यपसोबतचा फोटो पोस्ट केलाय. ज्यात ऐश्वर्यने अनुरागबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यानं लिहलं, "तुम्ही मला जे काही दिलं, त्यासाठी मी सदैव ऋणी आहे. मी तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि कायम शिकत राहीन. ते माझ्यासाठी अनमोल आहेत. तुम्ही मला मार्गदर्शन केलं आहे, मी याची कधीही अपेक्षा केली नव्हती" असे म्हणत त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं.
तो पुढे म्हणाला, "माझ्यासाठी तुम्ही फक्त दिग्दर्शक नाही तर तुम्ही माझे मार्गदर्शक, माझे शिक्षक, माझे मित्र आणि एवढंच काय तर तुम्ही मला वडिलांसारखे आहात. कितीही प्रयत्न केला तरी तुमचं माझ्यासाठी काय महत्त्व आहे, हे शब्दांत पूर्णपणे व्यक्त करणं शक्य नाही".
ऐश्वर्य म्हणाला, "गेल्या काही वर्षांतला तुमच्यासोबतचा प्रवास माझ्यासाठी खूप बदल घडवून आणणारा ठरला. केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर व्यक्ती म्हणूनही मी खूप काही शिकलो. सिनेमातून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी आता अवघ्या आठवडाभराचा वेळ उरला आहे आणि या क्षणी माझ्या मनात कृतज्ञतेची आणि उत्सुकतेची एक वेगळीच भावना दाटून आली आहे. तुमच्या हाताखाली काम केल्याचा आनंद आहे आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा यासाठी उत्सुक आहे".
पोस्टच्या शेवटी त्यानं म्हटलं, "प्रवासाची फक्त सुरुवात झाली आहे. पुढचा रस्ता तुमच्या मार्गदर्शनाखाली पार करण्याची मी वाट पाहतोय. तुम्ही मला जे काही शिकवलं, ते मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कामात उतरवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, मला पुढे नेण्यासाठी, प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आणि जे फक्त तुम्हीच करू शकणाऱ्या सत्याचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या कलेला, तुमच्या दृष्टीला सलाम. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सर", असं ऐश्वर्यनं म्हटलं. 'निशांची' हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.