Join us

Mithun Chakraborty Health Update : मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील फोटो व्हायरल, मुलानं दिली प्रकृतीबद्दल माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 14:17 IST

Mithun Chakraborty Health Update : सोशल मीडियावर मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला जात असून यामुळे चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

Mithun Chakraborty Health Update : बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती ((Mithun Chakraborty) ) यांचा एक व्हायरल फोटो पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत मिथुन रूग्णालयाच्या बेडवर झोपलेले दिसत आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी हा फोटो शेअर करत, मिथुन चक्रवर्ती लवकर बरे व्हावेत, अशी कामना केली आहे.हा फोटो समोर येताच, मिथुन यांच्या तब्येतीबद्दल अनेक अफवा पसरल्या. यामुळे चाहत्यांच्याही चिंता वाढल्या. पण तूर्तास घाबरण्याचं काहीही कारण नाही. मिथुन यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

मिमोहने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनचा त्रास उद्भवल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हायरल झालेला फोटो हा रुग्णालयातला आहे,ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती बेशुद्धावस्थेत बेडवर झोपलेले दिसत आहेत. पण आता मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर आहे. बंगळुरुमधील रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते एकदम फीट आहेत.  भाजपाचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपम हझारा यांनी मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ते लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थनाही केली आहे.

मिथुन अलीकडे ‘हुनरबाज’ या शोमध्ये जज म्हणून दिसले होते. अलीकडे विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात ते झळकले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

मिथुन चक्रवर्ती यांनी १९७६ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांचा पहिला सिनेमा होता ‘मृगया’. पहिल्याच सिनेमातील अभिनयासाठी मिथुन यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मिथुन हे अभिनयाबरोबरच अ‍ॅक्शन, नृत्यातही पारंगत होते. त्यांनी आतापर्यंत हिंदीबरोबरच बंगाली, ओडिया, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांत मिळून ३५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :मिथुन चक्रवर्तीबॉलिवूड