Join us

बॉलीवूडने वर्षभरात मुंबईत केली ३७३ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची खरेदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:24 IST

Mumbai: गेल्या वर्षभरात मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात बॉलीवूडमधील प्रमुख सिनेस्टार व तारकांनी तब्बल ३७३ कोटी ६४ लाख रुपयांची गुंतवणूक करत आपले मुंबईवरील प्रेम अधोरेखित केले आहे.

मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात बॉलीवूडमधील प्रमुख सिनेस्टार व तारकांनी तब्बल ३७३ कोटी ६४ लाख रुपयांची गुंतवणूक करत आपले मुंबईवरील प्रेम अधोरेखित केले आहे. गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक कार्यालयांच्या खरेदीचा धडाका लावल्यानंतर आता निवासासाठी देखील मुंबईतील आलिशान घरांची खरेदी केल्याची माहिती पुढे येत आहे. बॉलीवूडच्या दिग्गज खरेदीदारांच्या यादीत आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची भर पडली असून तिने वांद्रा (पश्चिम) येथे  एक आलिशान फ्लॅट तब्बल ११ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, वांद्रा (पश्चिम) हे बॉलीवूडकरांच्या पसंतीचे ठिकाण ठरल्याचे दिसत असून सोनाक्षी सिन्हा हिने वांद्रा रेक्लमेशन येथील एका आलिशान इमारतीमध्ये २४३० चौरस फुटांचा फ्लॅट ११ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे वृत्त आहे.  याकरिता तिने तब्बल ५५ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याचे समजते. विशेष म्हणजे, मार्च २०२० मध्ये याच इमारतीमध्ये तिने ४६३२ चौरस फुटांचा एक फ्लॅट १४ कोटींना खरेदी केला होता. 

कुणी कुठे काय खरेदी केले     दीपिका रणवीर - ११९ कोटी (घर)    राजकुमार राव - ४४ कोटी (घर)    आलिया भट - ३७ कोटी (घर)    सोनाक्षी सिन्हा - ११ कोटी (घर)     नीतू कपूर - बीकेसी, १७ कोटी (घर)     विराट अनुष्का - अलिबागमध्ये आलिशान बंगला १० कोटी (घर)     अजय देवगण - ४५ कोटी (कार्यालय)    ह्रतिक रोशन - ३५ कोटी (कार्यालय)    अमिताभ बच्चन - २९ कोटी (कार्यालय)    कार्तिक आर्यन - १० कोटी (कार्यालय)    सारा अली खान ९ कोटी (कार्यालय)    काजोल - ७ कोटी ६४ लाख (कार्यालय)

अभिनेत्री दीपिका पदुकोण व तिचा पती व अभिनेता रणवीर सिंह यांनी सुपरस्टार शाहरूख खान याच्या प्रसिद्ध मन्नत बंगल्याशेजारीच असलेल्या एका आलिशान इमारतीमधील १६, १७, १८, १९ या मजल्यांची खरेदी करत ११ हजार २६६ चौरस फुटांचे घर साकारल्याची माहिती आहे. याच इमारतीमध्ये दोघांनी एकूण १९ पार्किग लॉटदेखील खरेदी केल्याची चर्चा आहे. 

अभिनेत्री आलिया भट व रणबीर कपूर हे देखील आपल्या नव्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. शोमॅन राज कपूर यांच्या पाली हिल येथील नर्गिस दत्त रोडवरील कृष्ण-कुंज या बंगल्याच्या जागी आलिशान इमारत साकारली जात असून त्यामध्येच हे दोघे लवकरच राहायला जाणार आहेत. 

रणबीर कपूरची आई नीतू कपूरने मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे १७ कोटी रुपयांना एका फ्लॅटची खरेदी केल्याची माहिती आहे. मुंबईप्रमाणेच वीकेन्डसाठी अलिबाग येथे देखील मालमत्ता खरेदीसाठी सिनेस्टार पुन्हा एकदा सक्रिय झाले असून अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा व तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली यांनी १० कोटी रुपयांना एक मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे. 

टॅग्स :बॉलिवूडमुंबईअमिताभ बच्चनदीपिका पादुकोण