Azaad Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची (Raveena Tandon) लेक राशा थडानी मुख्य भूमिकेत असलेल्या 'आझाद' सिनेमाची सध्या चर्चा आहे. शुक्रवारी (१७ जानेवारी रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. २०२५ मधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत असलेल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. दरम्यान, कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' आणि 'आझाद' सिनेमा काल एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने त्याचा परिणाम हा चित्रपटाच्या व्यवसायावर होताना दिसतो आहे. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसाच्या कमाईचे आकडे आता समोर आले आहेत.
'आझाद' या सिनेमाच्या माध्यमातून अमन देवगण आणि राशा थडानी यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा ट्रेलर आणि 'उई अम्मा' या जबरदस्त गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता निर्माण झाली. शिवाय या चित्रपटात अजय देवगणचा स्पेशल कॅमिओ देखील आहे. परंतु चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात फक्त दीड कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती मिळते आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'आझाद' चित्रपटाने पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची ओपनिंग खूपच संथ आहे. त्यामुळे हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.