Pooja Hegde: बॉलीवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून अभिनेत्री पूजा हेगडेने (Pooja Hegde) जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या पूजा तिचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे लाईमलाइटमध्ये आली आहे. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि पूजा या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अभिनेत्रीचं नशीब फळफळलं आहे. पूजा हेगडेची एका हॉरर कॉमेडी चित्रपटात वर्णी लागल्याची माहिती मिळते आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पूजा हेगडे लोकप्रिय हॉरर कॉमेडी चित्रपट 'कंचना' या सिनेमाच्या चौथ्या पार्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या बिग बजेट प्रोजेक्टसाठी अभिनेत्रीला अप्रोच करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा पूजा हेगडेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय बॉलिवूड डान्सर, अभिनेत्री नोरा फतेहीला सुद्धा या चित्रपटासाठी ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत . एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार कंचना-४ च्या शूटिंगला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या मे २०२५ पर्यंत हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे सिनेरसिक प्रचंड खुश आहेत.
वर्कफ्रंट
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री पूजा हेडगेनं हृतिक रोशनसह 'मोहनजोदडो' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. अलिकडेच ती सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मुळे चर्चेत होती. आता लवकरच पूजा हेगडे 'देवा' सिनेमाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.