Join us

"माझी अनेकदा खिल्ली...", दिसण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना खुशी कपूरचं सडेतोड उत्तर, सांगितला 'तो' अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:06 IST

अभिनेत्री खुशी कपूर (Khushi Kapoor) तिचा आगामी सिनेमा 'लव्हयापा' मुळे प्रचंड चर्चेत आहे.

Khushi Kapoor: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बॉलीवूडच्या हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. जगभरात त्यांचे चाहते पाहायला मिळतात.आता आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत श्रीदेवी यांच्या दोन्ही मुलींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सध्या त्यांची धाकटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) तिचा आगामी सिनेमा 'लव्हयापा' मुळे प्रचंड चर्चेत आहे. येत्या शुक्रवारी ७ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खुशी कपूर वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुशी कपूरने तिच्या बालपणीच्या काही आठवणी शेअर केल्या. 

'इंडियन एक्सप्रेस'च्या स्क्रीन लाईव्ह या शोमध्ये नुकतीच खुशी कपूरने हजेरी लावली. त्यादरम्यान अभिनेत्रीने तिला लहानपणी दिसण्यावर ट्रोल केलं जायचं, या सगळ्याचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम झाला याबद्दल तिने खुलासा केला. त्यावेळी खुशी म्हणाली, "ही अतिशय वाईट गोष्ट आहे. लहानपणी दिसण्यावरुन माझी अनेकदा खिल्ली उडवली जायची. तू तूझ्या आई आणि बहिणीसारखी सुंदर दिसत नाही असं म्हटलं जायचं. त्यावेळी असं ऐकल्याने त्याचा परिणाम हा माझ्या आत्मविश्वासावर झाला आहे."

पुढे खुशी म्हणाली, "त्यानंतर मी स्वत: कडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मला नाही वाटत यात काही गैर आहे. स्किनकेअर, फिलर्स या गोष्टींवर जास्त चर्चा करण्यासारखं काही नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. तुम्ही काही केलं, नाही केलं तरी लोकं चर्चा करतात."

वर्कफ्रंट

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, खुशी लवकरच आमिर खान आणि रिना दत्ताचा मुलगा जुनैद खानसोबत आगामी 'लव्हयापा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय.

टॅग्स :खुशी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा