Isha Koppikar : मॉडेलिंग क्षेत्रापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री ईशा कोप्पिकर (Isha Koppikar) हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.परंतु, 'क्या कूल हैं हम' चित्रपटामुळे तिची चांगलीच चर्चा झाली. २००२६ साली आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. त्यात आता अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने या चित्रपटानंतर तिला आलेला अनुभव शेअर केला आहे. नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया.
'क्या कूल है हम' चित्रपटात ईशा कोप्पिकरसह, रितेश देशमुख, नेहा धुपिया, तुषार कपूर हे कलाकार देखील होते. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. दरम्यान, या चित्रपटात ईशाने एका पोलीस अधिकारी महिलेची भूमिका साकारली होती. अशातच काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने या चित्रपटानंतर एका पोलिसाने भर रस्त्यात तिची गाडी आडवली होती, याबद्दल सांगितलं. त्याविषयी बोलताना ईशा म्हणाली, मला आठवतंय भर रस्त्यात एका पोलिसाने माझी गाडी अडवली होती. मग मी माझ्या ड्रायव्हरला विचारलं की तू सिग्नल तोडलं का तर तो नाही म्हणाला. खरंतर, पोलिसांना माझ्या गाडीचा नंबर माहित होता. पण, तरीही त्यांनी मुद्दाम माझी गाडी अडवली. त्यानंतर ते माझ्या गाडीजवळ आले आणि खिडकी खाली करायला सांगितली. "
त्यानंतर ईशा म्हणाली, "ते पोलीस माझ्या गाडीजवळ आले आणि मला सल्यूट केला. शिवाय ते माझ्या चित्रपटाचं कौतुक करायला लागले. तुमच्या सारख्या महिला पोलीस अधिकाऱ्याची आमच्या पोलीस स्टेशनमध्ये गरज आहे. त्यांचे ते शब्द ऐकून मी भारावून गेले."
म्हणून भूमिका केली...
"जेव्हा या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवण्यात आली तेव्हा मला त्यामध्ये अश्लिल किंवा चुकीचं असं काहीच वाटलं नाही. माझं कॅरेक्टर स्वच्छ होतं. त्याचवेळी हॉलिवूडमध्ये कॉन्जेनियलीटी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. माझा रोल अगदी त्याप्रमाणेच होता. त्यामुळे मला ही भूमिका आवडली." असा खुलासा तिने केला.