Join us

कॉम्प्रोमाइज न केल्यामुळे अभिनेत्रीला केलं सिनेमातून बाहेर; एका दिवसात झाली सेटवरुन हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 10:05 IST

Bollywood actress: नुकताच या अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे.

आजवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचसारख्या भयानक प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. यात काही अभिनेत्रींनी उघडपणे या विषयावर भाष्य केलं. तर, काही जणींनी अनेक वर्ष हा अत्याचार सहन केला. परंतु, आता हळूहळू करत अनेक अभिनेत्री बेधडकपणे त्यांना आलेल्या अनुभवावर भाष्य करत आहेत. यामध्येच एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने तडतोड करण्यास नकार दिल्यामुळे तिला चक्क सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री अदिती गोवित्रीकर (aditi govitrikar) हिची मुलाखत चर्चेत येत आहे. अदितीने सिद्धार्थ कन्ननला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. यात तिने कॉम्प्रोमाइज करण्यास नकार दिल्यामुळे तिला थेट विदेशातून मुंबईत परत पाठवण्यात आलं होतं.

"एका मोठ्या सिनेमासाठी मी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. पण, ती व्यक्ती मला तडजोड करायला सांगते हे तेव्हाही मला कळलं नाही. मी त्याच्या तोंडावर हसले आणि तू वेडा आहेस की मुर्ख आहेस असा प्रश्न विचारला. पण माझ्या या बोलण्यामुळे त्याचा इगो दुखावला गेला आणि त्याने दुसऱ्याच दिवशी मला आणि माझ्या टीमला पॅकअप करायला सांगितलं. त्यावेळी मला समजलंच नाही की नेमकं काय घडलं", असं अदिती म्हणाली.

पुढे ती म्हणते, "त्यानंतर मला एका मिटींगसाठी बोलावण्यात आलं कारण, आम्ही तीन-चार दिवस शूटिंग केलं होतं. त्या लोकांनी मला सिनेमातून काढून टाकण्यासाठी अगदी किरकोळ कारण दिलं होतं. ही सगळी कारणंही खोटी होती. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मी तडजोड करायला तयार झाले नाही त्यामुळे त्यांनी मला सिनेमातून काढून टाकलंय."

दरम्यान, यापूर्वीही अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री इशा गुप्ता हिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला होता. तिनेही एका निर्मात्याला कॉम्प्रोमाइज करण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्यांनी तिला सिनेमातून काढून टाकलं होतं. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाकास्टिंग काऊच