Masti 4 Movie: बॉलिवूडमधील कॉमेडी फ्रँचायझी असलेल्या 'मस्ती' च्या सिरिजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सीक्वलही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता लवकरच मस्ती फ्रँचायझीचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासनी हे त्रिकूट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालं आहे. अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
नुकताच रितेश देशमुखने इन्स्टाग्राम अकाउंटवर 'मस्ती-४' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची माहितीही शेअर केली आहे. आता चौपट मजा आणि चौपट धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार असा अंदाज हा टीझर पाहून येतो आहे.'मस्ती-४' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मिलाप झवेरी यांच्या खांद्यावर आहे.येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या चौथ्या भागात रितेश देशमुख,विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासनी यांच्यासह अर्शद वारसी, तुषार कपूर, नर्गिस फाखऱी अशा तगड्या कलाकारांची फळी आहे.
'मस्ती' फ्रँचायझीचा पहिला भाग २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर २०१३ मध्ये 'ग्रँड मस्ती' चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला.तर तिसरा भाग २०१६ मध्ये प्रदर्शित झाला.आता लवकरच 'मस्ती-४' च्या निमित्ताने प्रेक्षकांना पु्न्हा तीच धमाल प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.