Join us

क्रांतीची ज्योत पेटली...; सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर, 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:26 IST

"यह युद्ध नहीं महायुद्ध हैं...", एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव; 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Phule Movie Trailer: झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. अशातच  फुले चित्रपटाचा २ मिनिटे १६ सेकंदाचा हा ट्रेलर पाहून अंगावर काटाच येईल. 

सोशल मीडियावर झी स्टुडिओजद्वारे 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील कलाकारांचे डायलॉग आणि अभिनयाने सिनेरसिकांचं लक्ष वेधून गेतलं आहे. 

या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली आहे. विनय पाठक हेदेखील चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

उत्कृष्ट निर्मिती

‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून 'फुले' हा हिंदी चित्रपट जगभर ११ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :सावित्रीबाई फुलेपत्रलेखाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा