Kartik Aaryan: कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुद्धा कार्तिक आर्यनने अभिनय क्षेत्रात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'सोनू के टिटू की स्वीटी', 'लुका छुपी', 'भूल भुल्लैय्या-२', 'भूल भुल्लैय्या-३' यांसारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचा अलिकडेच प्रदर्शित झालेला 'भूल भुल्लैय्या-३' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. दरम्यान, कार्तिक आर्यन एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या संघर्ष काळावर भाष्य केलं आहे.
नुकतीच कार्तिकने 'इंडियन एक्सप्रेस'च्या 'स्क्रीन लाईव्ह' या इव्हेंटला हजेरी लावली. त्या दरम्यान अभिनेत्याने त्याचं करिअर, चित्रपट याबद्दल मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यावेळी या इव्हेंटमध्ये कार्तिक आर्यन म्हणाला, "सुरुवातीला काहीच सोपं नव्हतं. आता इंडस्ट्रीत इतकी वर्ष होऊन गेली आहेत ती काहीच फरक पडत नाही. मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाला समान संधी मिळते. पण, मलाही वाटायचं की कोणत्याही स्टारकिड्सपेक्षा मला संधी मिळायला पाहिजे होती."
पुढे अभिनेत्याने सांगितलं, "या सगळ्यात त्यांचा काहीच दोष नाही. परंतु मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दोन कलाकारांच्या अभिनय प्रवासाबद्दल तुलना करणं हे फार चुकीचं आहे. कारण आउटसाइडर आणि इंडस्ट्रीतील कलाकार यांचा संघर्ष फार वेगळा असतो. त्यानंतर कार्तिक आर्यनने त्याच्या ऑडिशन दरम्यानचा किस्सा सांगत म्हणाला, "जवळपास २ ते ३ वर्षे मी ऑडिशन देत होतो आणि मला रिजेक्ट केलं जात होतं. परंतू अखेर मला 'प्यार का पंचनामा' हा सिनेमा मिळाला. या संधीसाठी मी कायम आभारी आहे."