Join us

कार्तिक आर्यनचा नवा सिनेमा, 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:12 IST

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kartik Aaryan: 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने आपल्या फिल्मी करिअरला खरी सुरुवात केली. त्यानंतर कार्तिकने सोनू के टिटू की स्वीटी', 'लुका छुपी', 'भूल भुल्लैय्या-२', 'भूल भुल्लैय्या-३' अशा उत्तमोत्तम चित्रपटांत काम करत स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता लवकरच अभिनेता एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्ल उत्सुकता निर्माण झाली आहे. 

'भूल भुलैया 3' ने बॉक्स ऑफिसवर तुफान गाजवल्यानंतर कार्तिक आर्यन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा अनटाइटल्ड चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये कार्तिक आर्यनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला दिसत आहेत. परंतु निर्मात्यांकडून त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव रिव्हील करण्यात आलेलं नाही. दरम्यान, या चित्रपटात कार्तिक आर्यनचा कधीही न पाहिलेला अंदाज  पाहायला मिळणार आहे. टी-सीरिजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या टीझरमध्ये  वाढलेले केस आणि दाढी अशा लूकमध्ये कार्तिक आर्यन दिसतो आहे. स्टेजवर रॉकस्टारप्रमाणे तो परफॉर्म करताना दिसत आहे. या चित्रपटात त्याने एका रॉकस्टारची भूमिका साकारल्याचे टीझर पाहून लक्षात येतंय. त्याचबरोबर टीझरमध्ये कार्तिक स्टेजवर 'आशिकी' चित्रपटामधील 'तू ही मेरी जिंदगी' हे गाणं गाताना दिसतोय. त्यावरून हा सिनेमा 'आशिकी' फ्रॅंचाईजीचा तिसरा भाग असू शकतो असे अनेक तर्कवितर्क चाहते लावत आहेत. परंतु या चित्रपटाचं नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

कार्तिक आर्यन त्याच्या आगामी सिनेमात साऊथ अभिनेत्री श्रीलीलाही या चित्रपटात त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसत आहे. श्रीलीला या चित्रपटातून तिचा बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला एक उत्कृष्ट डान्सर आहे. 'पुष्पा २' मधील आयटम सॉंगमुळे ती प्रसिद्धीझोतात आहे. परंतु यापूर्वी श्रीलीलाने 'गुंटूर करम' चित्रपटातील ‘कुरिची मदाथापेटी’ गाण्यात महेश बाबूबरोबर धमाकेदार डान्समुळे तिची सर्वत्र चर्चा झाली होती. 

कार्तिक आर्यन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला स्टारर हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अनुराग बसू याचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय चित्रपटाला संगीत प्रीतम यांनी दिलं आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा