Emraan Hashmi : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा सध्या 'ग्राउंड झिरो' या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. 'जन्नत', 'मर्डर-२' तसेच 'द दर्टी पिक्चर', 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' यांसारखे त्याचे चित्रपट चांगलेच गाजले. या रोमॅंन्टिक चित्रपटानंतर इमरान हाश्मी लवकरच मोठ्या पडद्यावर नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ग्राउंड झिरो हा चित्रपट २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने इमरान हाश्मीने एका मुलाखतीमध्ये 'आशिकी-२' चित्रपटासाठी पहिल्यांदा त्याला विचारणा करण्यात आली होती. असा खुलासा केला.
इमरान हाश्मीने 'lallantop Cinema'ला दिलेल्या मुलाखती वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. या मुलाखतीमध्ये त्याला चित्रपट नाकारल्याबद्दल कधी पश्चात्ताप झाला आहे का? याबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नाचं उत्तर देताना इम्रान म्हणाला की, "मला कोणताही चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप नाही. पण, 'अशिकी-२' या चित्रपटासाठी मला पहिल्यांदा विचारण्यात आलं होतं. ज्यासाठी मोहित सूरी यांना मी चित्रपटातील पात्रासाठी योग्य नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर इमरान म्हणाला की, 'आशिकी' फ्रॅंचायझीसाठी एका नवीन चेहऱ्यासह तयार केला पाहिजे. मूळ आशिकी चित्रपट हिट झाला कारण त्यात नवीन चेहरे होते कारण लोकांच्या मनात मुख्य कलाकारांबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे 'आशिकी-२' साठी फ्रेश चेहरा निवडावा असा सल्ला दिला होता."
दरम्यान, 'आशिकी-२' हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर या दोघांनाही लोकप्रियता मिळाली. आजही या चित्रपटातील गाणी, संवाद आणि पोझ यांच्यामुळे चित्रपटाची चर्चा नेहमीच होते.