Shiv Thakare: आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती असते. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं महत्व आणि स्थान अनन्यसाधारण आहे. आज संपूर्ण जगभरात मदर्स डे हा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा दिवस म्हणजे मातृत्वाचा सन्मान करणारा दिवस आहे. या दिवशी सर्वसामान्य मंडळींसह मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटीदेखील त्यांच्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा देत आहेत. याचनिमित्ताने अभिनेता शिव ठाकरेनेदेखील (Shiv Thakare) आईबरोबर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय त्याने त्याच्या आईला एक गोड सरप्राइज सुद्धा दिलं आहे.
'मदर्स डे' निमित्त शिव ठाकरेने त्याच्या आईबरोबरचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या सगळीकडे त्याच्या या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत शिवने लिहिलंय, मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा... आई! मातृदिनाचं औचित्य साधून शिवने आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला सुंदर असं गिफ्ट दिलं आहे. आईच्या हाताची प्रतिकृती (हॅंड कास्टिंग) तयार करुन त्याची एक फोटोफ्रेम बनवून आईला गिफ्ट केली आहे. दरम्यान, शिव ठाकरेने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये माय-लेकाच्या गप्पाही होताना दिसत आहेत. शिवाय ते दोघेही खळखळून हसतायत. शिवने या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'तू हैं तोजर नहीं लगता...', हे गाणं लावलं आहे. शिव ठाकरेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
'बिग बॉस मराठी २' मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता शिव ठाकरे याने आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने 'रोडीज', खतरों के खिलाडी' यासारख्या रिऍलिटी शोमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा चाहकतावर्ग देखील खूप मोठा आहे.