Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी बिग बॉसमध्ये केतकी माटेगावकरची एन्ट्री?, खुद्द केतकीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:30 IST

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

वादविवाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या पहिल्या पर्वाची विजेती ठरली अभिनेत्री मेघा धाडे. त्यानंतर या शोच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोची टीम प्री-प्रोडक्शनच्या कामाला लागली आहे. या शोच्या दुसऱ्या सीझनबाबत कलर्स मराठी वाहिनीने घोषणा केल्यानंतर या शोमध्ये कोणाची कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होणाऱ्या कलाकारांबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या नावाचीदेखील चर्चा होती. मात्र याबाबत खुद्द तिनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे. तिने इंस्टाग्रामवर सांगितले की, बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहण्याची आता वेळ जवळ आली आहे. मला बिग बॉस पहायला आवडते आणि मी दुसरा सीझन पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये दिसणार असल्याच्या वृत्तात अजिबात तथ्य नाही. ही अफवा आहे. मोठ्या काळ चालणाऱ्या कार्यक्रमात यावर्षी सहभागी होण्याचा विचार नाही. या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना व संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. 

केतकीच्या या पोस्टनंतर ती या सीझनमध्ये नसणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या कार्यक्रमातील शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपाणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

 

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता दुसऱ्या सीझनमध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :केतकी माटेगावकरबिग बॉस मराठी