Join us

'येस बॉस'वेळी अशोक सराफ यांनी शाहरुख खानला दिलेला सल्ला; म्हणाले, "एका सीनमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:57 IST

अशोक सराफ यांनी 'येस बॉस' वेळी शाहरुख सोबतचा एक किस्सा सांगितला

१९९७ साली आलेल्या 'येस बॉस' (Yes Boss) सिनेमात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि जुही चावलाची जोडी दिसली होती. सिनेमातील सगळी गाणी आजही लोक गुणगुणतात. या सिनेमात मराठी अभिनेते अशोक सराफही (Ashok Saraf) दिसले होते. 'चाँद तारे' या गाजलेल्या गाण्यात त्यांनी शाहरुखसोबत डान्सही केला आहे. नुकतंच अशोक सराफ यांनी 'येस बॉस' वेळी शाहरुख सोबतचा एक किस्सा सांगितला. शाहरुख किती मेहनती होता याचं उदाहरण त्यांनी दिलं.

'रेडियो नशा'ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी 'येस बॉस'ची आठवण सांगितली. ते म्हणाले, "इंडस्ट्रीत मी पाहिलेला सर्वात मेहनती व्यक्ती म्हणजे शाहरुख खान. तो आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो. त्याचे डोळे कायम उघडे असतात. तो उगाच स्टार झालेला नाही. तो छोट्यातली छोटी गोष्टही सोडत नाही. येस बॉस वेळी मी तर तसा त्याच्यासोबत नवीनच होतो. पहिल्यांदाच काम करत होतो. एका सीनला मी त्या म्हटलं, 'शाहरुख भाई, ये ऐसा नही...मजा नही आरा इसमे'. त्यावर तो लगेच शॉक होऊन म्हणाला,'क्या बात करता है, चल चल रिहर्सल करते है'. कितीही वेळा तो रिहर्सल करायचा. जोवर परफेक्ट होत नाही तोवर तो थांबायचा नाही. एखादा असता तर हा जाऊदे म्हणत सोडून दिलं असतं. पण शाहरुख तसं करत नाही. त्याला कितीही वेळा सांगितलं तरी तो तशा पद्धतीने करायला तयार होतो. करुन पाहतो. म्हणूनच मी सांगितलेलंही तो करायचा. माझं ऐकायचा. तो माणूसही खूप चांगला आहे."

शाहरुख खानला इंडस्ट्रीत ३३ वर्ष झाली आहेत. या ३३ वर्षात पहिल्यांदाच त्याला 'राष्ट्रीय पुरस्कार'जाहीर झाला आहे. २०२३ साली आलेल्या 'जवान'सिनेमासाठी शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांकडून शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :अशोक सराफशाहरुख खानबॉलिवूड